जगातील पहिले नाट्य संग्रहालय मुंबईत होणार; अभिनेता सुबोध भावेची खास पोस्ट

मुंबई : मराठी नाटकांचा समृद्ध इतिहास सांगणारे जगातील पहिले नाटकाचे संग्रहालय ‘मराठी नाट्य विश्व’ हे मुंबईत उभारण्यात येणार आहे. गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर, मराठी रंगमंच कला दालनासाठी भव्य स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालयाची इमारत दोन टप्प्यांमध्ये उभारली जाणार आहे. या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. या पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हा नाट्य क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण असल्याचे सुबोधने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे आभार व्यक्त केले आहेत.

याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, नाटक हे केवळ मनोरंजन नाही तर सामाजिक व्यंग आणि समस्यांवर बोट ठेवणारे असते. प्रत्येक राज्यांचे एक वैशिष्ट्य असते. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी आणि अभिमानास्पद परंपरा आहे आणि त्यामुळे माझ्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती. काळाच्या या महत्वाच्या पाऊलखुणा जपणे महत्वाचे आहे आणि त्यामुळेच कागदावरून आता प्रत्यक्ष जमिनीवर नाट्य संग्रहालयाचा हा प्रकल्प साकारणार आहे हे अतिशय समाधान देणारे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनी नाटके रेकॉर्ड व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रख्यात अभिनेता दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे, आदेश बांदेकर, ऋषिकेश जोशी, राजन भिसे, सखी गोखले तसेच दीपक राजाध्यक्ष, प्रमोद पवार, अभय जबडे, मंगेश कदम आणि राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता हांडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे. सुबोधने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी कला जगतात अनेक चरित्र भूमिका साकारणारा एकमेव अभिनेता म्हणजे सुबोध भावे असे जणू समीकरणच बनले आहे. सुबोधने यापूर्वी बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या चरित्र भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच त्याच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाची परदेश वारी झाली. या नाटकाच्या निमित्ताने सुबोधने बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. सुबोध विविध समस्या आणि सामाजिक गोष्टींवरही भाष्य करत असतो.

सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सुबोध भावे याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने ‘मराठी नाट्य विश्व’ या नाट्य संग्रहालयाच्या संदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सुबोधने ही इमारत कशी असणार, त्यात नेमके काय असणार, याबद्दल माहिती दिली आहे.

सुबोधने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तुम्हा सगळ्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर करताना अतिशय अभिमान वाटतोय. जगभरात कुठेही नाटकाचं संग्रहालय नाही. जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय उभारण्याचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतोय. आणि हे संग्रहालय असणार आहे मराठी नाटकाचं “मराठी नाट्य विश्व”. मुंबई येथे गिरगाव चौपाटी वर सद्य स्थितीत असलेल्या बिर्ला क्रीडा केंद्र च्या जागी हे भव्य दिव्य आणि मराठी नाटकाचा इतिहास सांगणार “मराठी नाट्य विश्व” उभं राहतय. मराठी नाटकाच्या सर्व शाखा आणि सर्वांना सामावून घेणारं हे संग्रहालय असेल. जगभरातील नाटकाच्या अभ्यासक आणि रसिक प्रेक्षकांसाठी हे एक आनंदाचं दालन असेल. ही कल्पना आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांची. त्यांच्या कल्पनेतून हे मराठी नाटकाचं संग्रहालय उभे रहात आहे.”

”महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होतंय. आणि आज मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते “मराठी नाट्य विश्व” चं बोधचिन्ह आणि वास्तूचं स्वरूप लोकार्पण करण्यात आलं. आम्हा सर्व रंगकर्मी आणि नाटकावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे मनापासून आभार व्यक्त करतो”.

https://www.instagram.com/p/CeD2fUOlRsS/?utm_source=ig_web_copy_link

सुबोध भावेच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. यावर कमेंट करताना अभिनेता स्वप्निल जोशी याने ”कमाल भावा, पूर्ण टीमचे अभिनंदन,” अशी कमेंट केली आहे. त्यासोबत इतरांनीदेखील फार छान, मस्त, अशा कमेंट केल्या आहेत. सुबोध भावेची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Share