‘कोण होणार करोडपती’ ६ जूनपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम येत्या ६ जूनपासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा घराघरांत आवडीने पाहिला जाणारा कार्यक्रम. हा कार्यक्रम पाहताना प्रत्येकाला जर मी हॉटसीटवर असतो/असते तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती, असे वाटते. लवकरच ‘सोनी मराठी’वर प्रेक्षकांना ही मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी मिळणार आहे.

‘आता आलीये आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, अशी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या पर्वाची टॅगलाईन आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर करणार आहेत.

सचिन खेडेकर हे हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीनी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचे महत्त्वाचे काम लीलया पार पाडतात. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे. ते ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची उत्तम सांगड घालतात. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी होत असतात. प्रत्येक स्पर्धकाचा जीवनसंघर्ष जाणून घेऊन, त्याला कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांना बोलते करण्याचे काम सचिन खेडेकर करताना दिसतात. सचिन खेडेकर हे सध्या सूत्रसंचालकाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत आहेत.

‘कोण होणार करोडपती या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमात कसे सहभागी व्हायचे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, यासाठी आधीच्या दोन्ही पद्धतीप्रमाणे नोंदणी करावी लागणार आहे. लवकरच सोनी वाहिनीकडून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

Share