आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी रंगणार समारोप सोहळा; दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटी होणार सहभागी

मुंबई : आयपीएल २०२२ चा अंतिम सामना २९ मे रोजी गुजरातमध्ये अहमदाबादला होणार आहे. यावेळी आयपीएलच्या फायनल सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. आता आयपीएलचा अंतिम सामना अन्य सामन्यांसारखा सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार नाही, तर रात्री ८ वाजता अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी समारोप सोहळा आयोजित केला जाणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या समारोप सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.

आयपीएलची फायनल यावेळी मोटेरा (अहमदाबाद) येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने हे सायंकाळी ७.३० वाजता सुरू होतात; पण आयपीएलचा अंतिम सामना मात्र आता उशिरा सुरू होणार आहे. कारण आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी आता पारंपरिक सांगता सोहळा रंगणार आहे. हा सोहळा २९ मे रोजी संध्याकाळी ६.३० मिनिटांनी सुरू होणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावणार असून ते मनोरंजनपर कार्यक्रम सादर करतील. हा सोहळा जवळपास ५० मिनिटे चालणार आहे, म्हणजेच हा सोहळा ७.२० वाजता संपणार आहे. त्यानंतर १० मिनिटांचा ब्रेक घेण्यात येणार आहे. या ब्रेकनंतर ७.३० मिनिटांनी टॉस करण्यात येणार आहे. टॉसनंतर पुन्हा एकदा अर्ध्या तासाचा ब्रेक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना ७.३० ऐवजी आता रात्री ८ वाजता सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी आयपीएलच्या प्रत्येक हंगामात उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असत. मात्र, २०१९ साली पुलवामा हल्ल्यामुळे तसेच २०२० आणि २०२१ च्या हंगामात कोरोना महामारीमुळे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र, यावेळी समारोपाचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआय तसेच आयपीएल संयोजन समितीने घेतला आहे.

आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी १०० टक्के आसन क्षमता ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलच्या अंतिंम फेरीसाठी मोटेराचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे पूर्णपणे भरलेले असणार आहे. सध्याच्या घडीला आयपीएलचा ज्वर टिपेला पोहोचला आहे. कारण सध्या प्ले ऑफची रेस रंगात आलेली आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत कोण पोहोचणार, याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना आहे.

प्लेऑफमधील चार सामने कोलकाता व अहमदाबादमध्ये  
दरम्यान, आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात प्लेऑफमधील चार सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन या स्टेडियमवर क्वॉलिफायर १ आणि एलिमिनेटर सामना खेळवला जाईल, तर क्वॉलिफायर २ आणि अंतिम सामना अहमदाबाद येथील मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

कुठे कोणते सामने होणार?
क्वालिफायर-१ : २४ मे २०२२ : संध्याकाळी ७.३० वाजता (कोलकाता, ईडन गार्डन)
एलिमिनेटर : २५ मे २०२२ : संध्याकाळी ७.३० वाजता (कोलकाता, ईडन गार्डन)
क्वालिफायर-२ : २७ मे २०२२ : संध्याकाळी ७.३० वाजता (अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम)
अंतिम सामना : २९ मे २०२२ : रात्री ८ वाजता (अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम)

Share