शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर तरी मोदी सरकार जागे होणार का? – महेश तपासे

मुंबई : आंधळे.. बहिरे.. मुके झालेल्या मोदी सरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही  म्हणूनच शेतकरी त्यांच्या वाढदिवशी आत्महत्या करत असून आता तरी मोदी सरकार जागे होणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तसा उल्लेख त्या शेतकऱ्याने केला आहे. देशातील लोकांना अन्न पुरवणारा आपला अन्नदाताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आत्महत्या करतो ही शोकांतिका आहे असेही महेश तपासे म्हणाले.

काय आहे नेमके घटना?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील रानमळा येथील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी लिहून जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली.

पंतप्रधान नरेंद मोदी यांचा शेतीवर कंट्रोल नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागिरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या शेतकऱ्याने लिहिले आहे.

दशरथ लक्ष्मण केदारी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस झाला. एकीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 94 कोटी रुपये खर्चून भारतात आणलेल्या चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडत होते. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने त्यांनाच शुभेच्छा देत आत्महत्या केली.

काय आहे चिठ्ठीत?

आत्महत्येआधी या शेतकऱ्याने एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी आपल्या यातना व्यक्त केल्या. फायनान्सवाले दमदाटी करतात. पतसंस्थावाले अपशब्द वापरतात. यामुळे आत्महत्या करत असल्याचे शेतकारी दशरथ केदारी यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. ते शेतकरी अल्पभूधारक असून त्याने शनिवारी आत्महत्या केली.

Share