‘अग्निपथ योजने’ अंतर्गत नौदलात होणार महिलांची भरती

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत यावर्षी नौदलात महिला खलाशींची प्रथमच भरती करण्यात येणार आहे. या महिला खलाशींना युद्धनौकांवर तैनात करण्यात केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

यंदा तीन हजार महिलांची नौदलामध्ये ‘अग्निवीर’ म्हणून भरती केली जाणार आहे. पहिली तुकडी ही १०-२० टक्क्यांची राहील. त्यांचे प्रशिक्षण ओडिशातील आयएनएस चिल्का येथील आस्थापनेत २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

भारताच्या तिन्ही संरक्षण दलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी काल रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत ‘अग्निपथ’ योजना रद्द केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आर्मीचे लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी अग्निवीरांना सियाचीन आणि इतर क्षेत्रात सैनिकांना जशा सुविधा दिल्या जातात तशा सुविधा दिल्या जातील. सेवाशर्तींमध्येदेखील मतभेद केले जाणार नाहीत. भारतीय सैन्य दलातील जवानांचे सध्याचे सरासरी वय ३२ वर्ष आहे. इतर देशांच्या सैन्य दलांचा अभ्यास करुन ते २६ वर्षांपर्यंत आणले जाणार असल्याचे पुरी यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेस आर्मीचे लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा, नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि हवाई दलाचे एअर मार्शल सूरज झा हेही उपस्थित होते.

अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, नौदलात ‘अग्निपथ’ योजनेबाबत भेदभाव नसेल. ३० महिला अधिकारी या सध्या युद्धनौकांवर तैनात आहेत. नौदलात महिला खलाशींची भरती करण्याचे आता आम्ही ठरवले आहे. सर्व विभागात महिला असतील. १४ लाखांच्या लष्करी सैन्यात महिलांचा १९९० वर्षापासून समावेश होऊ लागला. मात्र, २०१९-२० मध्ये त्या अधिकारी होत्या. ७० हजार अधिकाऱ्यांच्या केडरमध्ये महिलांची संख्या केवळ ३ हजार ९०४ (लष्करात १,७०५, वायुदलात १,६४० आणि नौदलात ५५९) होती.

या व्यतिरिक्त ९ हजार अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या लष्करात १०० महिला जवान आहेत. २०१९-२० मध्ये पहिल्यांदाच ‘अदर रँक्स’ अंतर्गत महिलांची भरती सुरू झाली. १९९ पेक्षा अधिक सीएमपी महिलांची गेल्या दोन वर्षांमध्ये भरती करण्यात आली असल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली

Share