योगी आदित्यनाथजी, तुम्हाला सलाम! अभिनेता सुमीत राघवनचे ट्विट चर्चेत

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो. प्रत्येक विषयावर तो आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. नुकतेच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ रस्त्यांच्या समस्यांबाबत बोलत आहेत. त्याचबाबत सुमीतने देखील ट्विट करीत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.

सुमीत राघवनचे ट्विट
सुमीत राघवनने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करत म्हटले आहे की, “रस्ते, स्पीड ब्रेकर, रोड माफियांबाबत बोलताना एखाद्या राज्याच्या प्रमुखाला मी पहिल्यांदाच पाहतोय किंवा ऐकतोय. त्यांचा हेतू नेमका काय आहे हे योगी आदित्यनाथ यांच्या डोळ्यांमधून आणि आवाजामधून स्पष्ट होतं. कोणतीच वायफळ बडबड नाही. शब्दांचा खेळ नाही. योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, असे सुमीतने म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी नेमके काय म्हणाले?
सुमीतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, “रस्त्याच्या बाजूला कोणतीच वाहनं उभी करू नयेत. हायवेला तर कित्येक ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवण्यात येतात. पण असं का होतं? यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. नियमित पेट्रोलिंग करा, अन्यथा गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करा. एखाद्या ढाब्यावरदेखील पार्किंगसाठी जागा नसेल तर अशा ढाब्यांवर कारवाई करा.”

योगी आदित्यनाथ या व्हिडीओमध्ये ट्राफिक, रस्त्यांवर होणारे अपघात आणि त्यावर काय उपाय करता येईल हे सांगताना दिसत आहेत. सुमीतने ट्विट केलेल्या या व्हिडीओला अनेकांना कमेंट्स केल्या आहेत. महाराष्ट्रालादेखील अशा नेतृत्वाची गरज आहे, मुंबईमध्ये असे नियम लागू केले पाहिजेत अशा विविध कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

Share