ढुंढते रह जाओगे ! राऊतांचा पुन्हा भाजपावर टोला

मुंबईः   मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपावर जोरदार टिका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, मला वाटते केवळ महाराष्ट्रातच इन्कम आणि टॅक्स आहे. मुंबई सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते. जिथे जिथे भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात इन्कमही नाही आणि टॅक्सही नाहीये. या राज्यांमध्ये सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल करतानाच महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे सेंट्रल एजन्सीला केवळ महाराष्ट्रातच काम आहे किंवा पश्चिम बंगालमध्येच काम आहे. बाकी संपूर्ण देश ओस पडला आहे. आम्ही या सर्व गोष्टी नमूद करत आहोत. जनताही पाहत आहे. जे शोधायचे आहे. शोधू द्या. ढुंढते रह जाओगे, असे संजय राऊत म्हणाले.

महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्रास देण्याचं काम सुरू आहे. आम्ही हा त्रास सहन करायला तयार आहोत. सर्व गोष्टी नोट करून ठेवत आहोत. मात्र, परत सांगतो, महाराष्ट्र वाकणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

काय आहे यशवंत जाधव यांच प्रकरण

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आले असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, मात्र तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झालं आहे. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेले आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचे म्हणण आहे.

Share