फोडा-झोडा सोडा आणि मराठी माणसाला गाडा हेच तुमचं मिशन; सामना’च्या टीकेला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होते, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. यावर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सामनाच्या अग्रलेखावर शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेवर प्रतिहल्ला केला आहे.

अशिष शेलार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे त्यात ते म्हणतात, दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता, पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सर्त्तेत कोण बसले ? फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

मराठी माणसात फूट, ही आरोळी १००% झुट !
महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले, तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे, आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई कि विरार ? कि आणखी त्याच्यापण पुढे?

हे मिशन नव्हे “कमिशन”
कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले बंधू” राजांनी वेगळी चूल मांडली खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले. तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच. स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय? नाचता येईना अंगण वाकडे, स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

काय म्हटले अग्रलेखात?
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होते, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला. याबरोबरच बंडखोरीवर देखील सेनेने टीका केली आहे. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जातेय, शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचतोय, असेही सामनात म्हटले.

Share