‘नवाब मलिक यांना आपली बाजू….’ जयंत पाटीलांचे वक्तव्य

मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीच्या व्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यावर भाजपा कडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.  यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वक्तव्य केले आहे.  विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशन सुरू झाल्यापासून करत आहेत. परंतु मलिक यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
जयंत पाटील म्हणाले की,  कोणत्या मंत्र्याला तुरुंगात ठेऊन त्यांचे राजीनामे घ्यायचे हे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही. एखादा गुन्हा सिद्ध झाला तर मंत्र्यांचा राजीनामा घेणे समजू शकतो असे ते म्हणाले. अनिल देशमुख यांच्याबाबत त्यांनी राजीनामा स्वत:हून दिला. त्यानंतर देशमुखांवर अनेक गुन्हे लावण्यात आले. ९५ वेळा त्यांच्या विविध निवास ठिकाणी छापे मारणे सुरू आहे. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक होत आहेत ही धारणा सर्वांची झाली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

नवाब मलिक यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली असती तर ते समजूत घालू शकले असते, पण त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना उलट माहिती देऊन स्पष्टीकरण देण्याची संधी द्यायला हवी होती, असे जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे त्यांचे राजीनामे आम्ही घेत बसणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
Share