केंद्राची झेड प्लस सिक्युरिटी हाच एक मोठा घोटाळा : संजय राऊत

मुंबई : राज्यात सरकार पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप भाजपचे नेते करतात. मग केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालय कोणासाठी काम करते? न्यायालयातील दिलासा घोटाळे कोणाच्या इशाऱ्यावर केले जातात? असे प्रश्न उपस्थित करत केंद्राची झेड प्लस सिक्युरिटी हाच एक मोठा घोटाळा आहे, असा आराेप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. अपरिपक्व विरोधी पक्षनेत्यामुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आली आहे, असाही आरोप राऊतांनी केला.

रविवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना खा. संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा आगपाखड केली. शिवसेनेविरूद्ध बोलणाऱ्यांना केंद्र सरकारची सुरक्षा आहे. गुन्हेगारांना भाजपने पाठबळ दिलेले आहे. गुन्हेगारीसाठी भाजपला मळमळ का होत आहे? असा सवाल करत भाजपची ‘एमआयएम’शी छुपी युती आहे. हिंमत असेल तर समोर येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था आणि शांततेला धोका निर्माण होण्यास सर्वस्वीपणे राज्यातील अपरिपक्व विरोधी पक्षनेताच कारणीभूत आहे, असे वक्तव्य खा. राऊत यांनी यावेळी केले. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न वाटत असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना भेटायला पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. मुख्यमंत्र्यांसमोर विरोधी पक्ष आपले म्हणणे मांडतो, मुख्यमंत्री ते ऐकतात. त्यानंतर तुम्हाला राष्ट्रपती, संयुक्त राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत जिथे कुठे जायचे असेल तिथे जावे, अशी उपरोधिक टिप्पणी खा. राऊत यांनी केली. काही झाले तरी भाजपचे नेते दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिव किंवा गृहमंत्र्यांना भेटतात. हा काय तमाशा लावला आहे? महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने निवडून आलेले सरकार आहे. ही गोष्ट भाजपला समजत नाही का? ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली, असा सवालही खा. राऊत यांनी उपस्थित केला.

देशद्रोहींवर दगड पडतातच!

किरीट सोमय्यांवर शनिवारी झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना खा. राऊत म्हणाले, ‘आयएनएस विक्रांत’ निधी घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या हे आरोपी आहेत. या घोटाळ्याप्रकरणी लोकांमध्ये संताप आहे. त्यांचा शौचालय घोटाळादेखील लवकरच समोर येईल. यासाठी सोमय्यांच्या युवा प्रतिष्ठानचे अकाउंट तपासायला हवे. सोमय्या यांच्या संस्थेला निधी कुठून मिळाला, त्यांचे देणगीदार कोण आहेत, हे पाहिले पाहिजे. यापैकी बरेच देणगीदार असे आहेत की, ज्यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. हे लोक सोमय्यांच्या युवा प्रतिष्ठानला पैसे देतात. मी त्यांची नावही सांगू शकतो. देशद्रोही गुन्हेगारांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. देशद्रोहींवर दगड पडतातच. ‘विक्रांत घोटाळा’ म्हणजे देशाची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

 

Share