पंतप्रधानांची उज्ज्वला गॅस योजना ठरते अपयशी

मुंबई:   घरगुती गॅस सिलिंडरचे दर हजारावर पोहोचल्याने ग्रामीण भागातील गृहिणींना पुन्हा एकदा चूल पेटवण्याची वेळ ओढवली आहे. चुलीच्या धुरामुळे गृहिणींच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली होती. परंतु वाढत्या महागाईमुळे गॅसचे दर हजार रुपये झाले. या योजनेंतर्गत गॅस धारकांना दीडशे ते तीनशे रुपये सबसिडी मिळायची. ती आता पाच रुपयांवर आली. गॅस सिलिंडरचे दर वाढलेले असून सबसिडी वाढलेली नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणे ग्रामीण भागातील गृहिणींना त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. डोक्यावर पुन्हा एकदा मोळीचा भार सोसत त्यांनी घरात चूल पेटवण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधानांनी सुरू केलेली उज्ज्वला गॅस योजना वाढत्या महागाईमुळे पूर्णपणे अपयशी ठरली आहे. हातावर पोट भरणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला गॅस सिलिंडर खरेदी करणे शक्य नाही. त्यावर मिळणारी सबसिडीही कमी झाल्याने खर्चाचा भार पेलवणारा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींनी पुन्हा एकदा चूलीवर संसार थाटला आहे. दिवसेंदिवसे महागाई नवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वेळीच केंद्र सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करत पावले उचलली नाहीत तर जनता महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं आहे.

Share