नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अमदुरा गावातील एका १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. चंद्रकांत शंकर पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पाच दिवसांपासून बेपत्ता होता. आज सकाळी गावातील झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुदखेड तालुक्यातील अमदुरा गावातील रहिवासी चंद्रकांत शंकर पवार हा २९ एप्रिल रोजी घरातून किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, नंतर तो घरी परतलाच नाही. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने चंद्रकांतच्या कुटुंबियांनी नातेवाईक तसेच मित्रमंडळीकडे त्याचा शोध घेतला. मात्र, तो तिथेही आला नसल्याचे त्यांना कळाले. अखेर पवार कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत चंद्रकांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तेव्हा पासून पोलिस चंद्रकांतचा शोध घेत होते.
दरम्यान, तब्बल पाच दिवसांनी म्हणजे आज मंगळवारी (३ मे) चंद्रकांतचा मृतदेह गावातील झुडूपात आढळून आला. एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांतचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी चंद्रकांतचे वडील शंकर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रकातच्या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.