शालेय बस वाहतूक शुल्कात ३० टक्के वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून, या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना त्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. शाळा सुरू होताच शैक्षणिक शुल्कात वाढ आणि महागड्या पुस्तकांच्या दणक्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या वाहतूक शुल्कातही मोठी वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआरच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतूक शुल्कात तब्बल ३० टक्के वाढ करण्यात आली आहे.

 

देशात गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा तर सपाटाच सुरू आहे. पेट्रोलचे दर सव्वाशे रुपये लिटरच्या जवळपास गेले आहेत. तसेच डिझेलनेही केव्हाच शंभरी पार केली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून, आता जवळपास सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले आहे. महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचे घर खर्चाचे बजेटही पूर्णत: कोलमडून गेले आहे. त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे कमी होते म्हणून की काय, आता स्कूल बसच्या दरातही ३० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय दिल्ली असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अधिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शाळा मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की, डिझेलचे दर वाढल्याने या शुल्कात इतकी मोठी वाढ होऊनही त्यांना काही करता येत नाही.

 


यासंदर्भात दिल्ली पॅरेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अपराजित गौतम म्हणाले की, अनेक शाळांना ट्रान्सपोर्ट शुल्काच्या दुप्पट, तिप्पट पैसे वसून केले जात आहेत. या भरमसाठ दरवाढीमुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना खासगी वाहनांनी शाळेत सोडत आणि शाळेतून परत नेत आहेत. अनेक पालकांनी सांगितले की, ऑनलाइन क्लासच्या वेळी विद्यार्थ्यांकडून शालेय बस वाहतुकीचे शुल्क घेतले गेले नव्हते. हे शुल्क आता ऑफलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर वसूल केले जात आहे.

Share