पुण्यानंतर आता औरंगाबादचाही तिढा सोडवावा; मनसैनिकांचे सोशल मिडीयावर कॅंपेन

सुमित दंडुके/औरंगाबाद : शिवतीर्थावर राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात मशिदीच्या भोंग्यांवरुन चांगलेच राजकारण तापले होते. यामुळे पक्षांतर्गत वाद देखील सुरु झाले होते. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या त्या विधानावर नाराजी दर्शविली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली होती. आणि साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष पद देण्यात आले होते. यानंतर वसंत मोरे पक्ष सोडतात की काय, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, वसंत मोरेंनी पक्षात कायम राहणार असल्याच जाहीर केल होत. त्यानंतर स्वत: राज ठाकरेंनी वसंत मोरेंना ‘शिवतीर्थ’ या  त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेत गैरसमज दूर केले होते. ‘मनसे एक पक्ष नसून परिवार आहे’. असे म्हणत वसंत मोरे आणि राज ठाकरेंचे फोटो देखील शेअर करण्यात आले होते.

याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील मनसैनिकांकडून औरंगाबादचाही तिढा राज ठाकरेंनी सोडवावा अशी मागणी होत आहे. सोशल मिडीयावर #wesupportsuhasdashrathe (वी सपोर्ट सुहास दाशरथे) याबाबतीत कॅंपेन चालवून राज ठाकरेंकडे न्याय मागितला जात आहे.

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पक्षांतर्गत काही कारणांमुळे राज ठाकरेंनी तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथेंचे पद काढून घेतले होते. तसेच नव्याने काही पद वाटप करण्यात आले होते. मात्र, पद काढून घेतल्यानंतरही आपण मनसैनिक म्हणून पक्षासाठी आणि राज ठाकरेंसाठी काम करत राहणार असे मत सुहास दाशरथेंनी व्यक्त केले होते. त्यांचे पद काढून घेतल्यानंतर त्यांच्या अनेक नाराज कार्यकर्त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतू आपण मनसैनिक म्हणून कायम राहू अशी भूमिका या सर्वांनी घेतली होती.

या सर्व घटनेला आता काही महीने उलटले आहेत. तरीदेखील हे सर्व कार्यकर्ते पक्षाप्रती आपली एकनिष्ठता कायम राखत राज ठाकरेंच्या बोलावण्याची वाट पाहत आहेत. राज ठाकरेंपर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रातील इतर मनसैनिकांसोबत मिळून त्यांनी #wesupportsuhasdashrathe (वी सपोर्ट सुहास दाशरथे) अश्या स्वरुपाचे कॅंपेन सुरु केले आहे.  राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे पुण्याचा तिढा सोडवला त्याचप्रमाणे औरंगाबादचाही तिढा त्यांनी सोडवावा अशी मागणी आता हे मनसैनिक करत आहेत.

Share