राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणी शिल्लक

पुणे : उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यातील प्रमुख धरणे आणि जलाशयांमध्ये आजघडीला सुमारे ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये यंदा सर्वांत कमी म्हणजे अवघा ३५ टक्के पाणीसाठा असून, औरंगाबाद आणि अमरावती विभागातील धरणांमध्ये प्रत्येकी सुमारे ५० टक्के पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागातही पाण्याची परिस्थिती बिकट असून, या विभागातील धरणांमध्ये सुमारे ४२ टक्के पाणी शिल्लक आहे.

दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिलेल्या आठ धरणांपैकी चार धरणे पुण्यातील आहेत. तसेच शून्य टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये पुण्यातील नाझरे या धरणाची नोंद झाली आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असला तरी पावसाळा सुरू व्हायला अजून बरेच दिवस बाकी आहेत. दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे उकाडा वाढत असल्याने पुणेकरांची चिंता आणखी वाढली आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वांत कमी पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई भेडसावण्याची चिन्हे आहेत.

राज्यात लहान-मोठी मिळून ३२६७ धरणे आहेत. त्यामध्ये १४१ मोठे प्रकल्प असून, २५८ मध्यम प्रकल्प आणि २ हजार ८६८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्प आणि जलाशयांमधील पाणीसाठ्याचा आढावा जलसंपदा विभागाने घेतला असून, राज्यातील लहान-मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वांत कमी म्हणजे सुमारे ३५ टक्के, तर त्याखालोखाल नागपूर विभागातील धरणांमध्ये सुमारे ३८ टक्के पाणीसाठा आहे. नाशिक विभागामध्येही परिस्थिती बिकट असून, या विभागातील धरणांमध्ये सुमारे ४२ टक्के पाणी शिल्लक आहे. अमरावती आणि औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये प्रत्येकी सुमारे ५० टक्के आणि कोकणातील धरणांमध्ये सुमारे ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये सुमारे एक टक्का पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत सुमारे ४० टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा उन्हाच्या झळा वाढल्या असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा तुटवडा भासणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

नाझरे धरणात शून्य टक्के पाणी

जलसंपदा विभागाने प्रदेशनिहाय अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे सहा विभाग केले आहेत. या प्रत्येक विभागातील पाण्याच्या स्थितीचा आढावा जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील स्थिती यंदा नाजूक बनली आहे. पुण्यात ३५ मोठे प्रकल्प, ५० मध्यम प्रकल्प आणि ६४१ लघु प्रकल्प असून, गेल्या वर्षी पावसाळ्यात सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, सध्या या धरणांमध्ये सुमारे ३५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या महिन्यात धरणांमध्ये सुमारे ३३ टक्के पाणी शिल्लक होते. राज्यात यंदा शून्य टक्के पाणीसाठा असलेले पुणे जिल्ह्यातील नाझरे हे एकमेव धरण आहे. गेल्या पावसाळ्यात हे धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, सध्या ते कोरडे पडले आहे.

औरंगाबाद विभागातील जवळपास सर्वच धरणे निम्मी रिकामी
औरंगाबाद विभागात धरणांची संख्या सर्वाधिक असली, तरी जवळपास सर्वच धरणे निम्मी रिकामी झाली आहेत. या विभागात ९६४ धरणे आणि जलाशय आहेत. नागपूर विभागात दरवर्षी अन्य प्रदेशांपेक्षा कमी पाणीसाठा असतो. नागपूर विभागात गेल्या वर्षी आतापर्यंत सुमारे ४४ टक्के पाणीसाठा होता. मात्र, या वर्षी या विभागात सुमारे ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात पाण्याबाबतीत निराशाजनक चित्र आहे. या विभागात २४ मोठी धरणे, ५३ मध्यम धरणे आणि ४९४ लघु प्रकल्प आहेत. त्यामुळे पाणी साठविण्यासाठी पुरेसे प्रकल्प आहेत. तरीही यंदा पाणीसाठा सुमारे ४२ टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण सुमारे ४४ टक्के होते.

अमरावती विभागात ५० टक्के, तर कोकण विभागात ४९ टक्के पाणीसाठा
अमरावती विभागातील ४४६ धरणे आणि जलाशयांमध्ये सध्या सरासरी ५० टक्के पाणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा थोडा जास्त आहे. गेल्या वर्षी सुमारे ४७ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागात सुमारे ४९ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एक टक्के पाणीसाठा जास्त असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

१० टक्क्यांहून कमी पाणीसाठा असलेली धरणे

धरण—-जिल्हा—-टक्के

  • खडकपूर्णा—–बुलडाणा—–९.६४
  • बावनथडी—–भंडारा—– ८.००
  • सिरपूर—–गोंदिया—– ३.९१
  • वाकी —–नाशिक—– ०.९
  • पिंपळगाव जोगे—–पुणे—– ०.०४
  • माणिकडोह—–पुणे—–८.६४
  • विसापूर—–पुणे—–५.३९
  • नाझरे—–पुणे—–०.००
Share