मान्सून : शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या दोन वर्षात पावसाळ्याची सुरुवात ही वादळांनीच झाली आहे. यंदादेखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितील शून्य सोडण्याबाबत हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत आदेशित करावे, अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी मान्सूनपूर्व बैठकित केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे मान्सून पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी  उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त या बैठकीला दूरदृश्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते.

७ जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या ९ तुकड्या तैनात 

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षात अचानक कमी कालावधीत जास्त पाऊस पडला. तसेच निसर्गाचा अंदाज कळत असला तरी कधी काय घडेल हे सांगता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात आपण सर्व यंत्रणांनी मान्सूनपूर्व सर्व तयारी चांगली केली आहे. विशेषत: पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये अगोदरपासून तैनात करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी २ तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर, येथे प्रत्येकी एक टिम १५ जूनपासून पोहोचतील.  याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे १५ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा रीतीने पूर्व नियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले.

त्याबरोबर  धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय अजिबात मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे धरण क्षेत्रातील व परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून १५ जूनपासून लाईव्ह पाहू शकतो. तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे याचा निश्चित उपयोग होईल, असे  मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जलसंपदा विभागानेही पूर कालावधीत दक्ष राहणे गरजेचे : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पूर कालावधीत धरणातील पाणी साठ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. स्थानिक यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. तसेच आपत्ती कालावधीत संपर्क यंत्रणा प्रभावी असण्यासाठीदेखील आपत्ती विभागाने दक्ष राहावे. मुंबईत पाणी साठल्यामुळे मॅन होल वरती जाळी बसवून ज्या ठिकाणी जाळी बसवली आहे त्या ठिकाणी मॅन होल आहे हे समजावे यासाठी मोठी पताका उभारावी जेणेकरून या ठिकाणी लोक जाणार नाहीत. कोकण तसेच कोल्हापूर, सातारा व सांगली या भागात वाढता पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम कायमस्वरूपी या भागात राहण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपत्ती कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.

Share