साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला फाशी

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथे एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी मोहन चौहान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने आज गुरुवारी ही शिक्षा सुनावली आहे.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये साकीनाका परिसरात हे भयानक हत्याकांड घडले होते. यामध्ये आरोपीने एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. तपासादरम्यान, पीडितेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. घटनेनंतर संबंधित महिलेला मृतदेह एका टेम्पोमध्ये आढळून आला होता. तसेच या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले होते. मुंबईतील या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. या हत्याकांडानंतर याची गंभीर दखल राज्य महिला आयोग व केंद्रीय महिला आयोगाने घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मोहन चौहानला अटक करत ७७ साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेत ३४६ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने ३१ मे रोजी आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवले होते. न्यायालयाने गुरुवारी (२ जून) आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

नेमके काय घडले होते?
साकीनाका येथे खैरानी रोड भगत एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. १० सप्टेंबर २०२१ च्या मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान त्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कंट्रोल रुमला फोन करून एका बाईला मारहाण सुरू असल्याचे कळवले होते. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी दहा मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत पीडित महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. त्यावेळी पोलिसांनी त्या टेम्पोची चावी वॉचमनकडून घेऊन टेम्पो चालवत महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरित उपचार सुरू केले होते; पण उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Share