शिवसेनेला संपवल्याचा संजय राऊतांना आनंद झाला असेल; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची बोचरी टीका

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास ४२ हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला असेल, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

“संजय राऊत खूश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने,” अशा आशयाचे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काल शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊत हे प्रत्यक्षात एक आणि माध्यमांसमोर दुसरे बोलत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. याच मुद्द्यावरून आज नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

Share