“सारा देश देख रहा है, गुवाहाटी में छुपे गद्दारोको, माफी नही करेगी जनता, ऐसे फर्जी मक्कारो को…”

गुवाहाटी : महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे सरकारमधील नऊ मंत्री आणि ४० हून अधिक आमदार आसामची राजधानी गुवाहाटीतील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुक्कामाला आहेत. शिवसेनेच्या या बंडखोर मंत्री आणि आमदारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही गुवाहाटीत फिल्मी स्टाईल बॅनर लावून शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचा निषेध केला आहे. हॉटेलबाहेर लावलेल्या एका मोठ्या होर्डींगवर “सारा देश देख रहा है, गुवाहाटी में छुपे गद्दारोको, माफी नही करेगी जनता, ऐसे फर्जी मक्कारो को”, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

आसामच्या राजधानीमधील म्हणजेच गुवाहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हे पंचतारांकित हॉटेल २२ जूनपासून महाराष्ट्रातील राजकीय हालचालींचे केंद्रस्थान बनले आहे. या हॉटेलच्या बाहेर शिवसेनेचे बंडखोर आमदार विरुद्ध विरोधक अशी बॅनरबाजी सुरू झाली आहे. काल म्हणजेच २७ जून रोजी या हॉटेलबाहेरील एका मोठ्या होर्डींगवर बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंसह लावलेले होर्डींग झळत होते. मात्र, आज या हॉटेलबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने फिल्मी स्टाईल बॅनर झळकावत बंडखोर आमदारांवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलच्या बाहेर बॅनर लावले आहे. ”गुवाहाटीत गद्दार लपलेत, जनता माफ करणार नाही,” अशी बोचरी टीका या बॅनरमधून बंडखोर शिवसेना आमदारांवर करण्यात आली आहे. या हॉटेलबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘बाहुबली’ या गाजलेल्या चित्रपटामधील एक दृष्य दिसत आहे. कटप्पाने बाहुबलीवर पाठीमागून वार केल्याचे दृष्य बॅनरवर दिसत असून त्याच्या बाजूला ‘गद्दार’ हा हॅशटॅग देण्यात आला आहे.

दरम्यान, कालच या हॉटेलसमोर एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ होर्डींग झळकावण्यात आले होते. मात्र हे होर्डींग आज काढून टाकण्यात आले आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाईला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत वास्तव्यास असणाऱ्या ‘रेडिसन ब्लू’ या हॉटेलमधील मुक्काम ५ जुलैपर्यंत वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना या याचिकेवर १२ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता हे बंडखोर आमदार १२ जुलैपर्यंत येथेच थांबतात की, अन्य ठिकाणी जाणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Share