मुंबई : मुंबईतील कांदिवली (पश्चिम) मध्ये एका रुग्णालयामध्ये चार जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमाला विरोध केल्यामुळे चालक म्हणून कामाला असलेल्या एकाने आई आणि तिच्या दोन मुलींची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
किरण आशिष दळवी, भूमी आशिष दळवी, मुस्कान दळवी आणि शिवदयाल सेन या चार जणांचे मृतदेह कांदिवली (पश्चिम) मध्ये एका रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सापडले आहेत. कांदिवलीमधील देना बँक जंक्शन येथे गुरुवारी पहाटे एक व्यक्ती हातात विळा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी एका व्यक्तीला दोन महिलांसह एका रुग्णालयात जाताना पाहिले आणि त्यांना त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. नंतर पोलिसांनी परिसराची झडती घेतली असता, एका रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर तेथे दोन व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळल्या, तर दुसऱ्या मजल्यावर दोन महिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडले.
मृत शिवदयाल सेन याच्या खिशात पाच सुसाईड नोट्स पोलिसांना सापडल्या आहेत. त्यात भूमी दळवीच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कोयता हस्तगत केला आहे. चालक म्हणून कामाला असलेल्या शिवदयाल सेन याचे डॉक्टर महिलेच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. आई आणि मोठ्या बहिणीचा प्रेमाला विरोध होता म्हणूनच शिवदयाळ याने प्रथम मालकीण आणि तिच्या दोन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे कांदिवली परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.