एकनाथ शिंदे आणि भाजपची आधीपासूनच छुपी युती

जळगाव : भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गट यांची आज नव्हे तर आधीपासूनच अलिखित छुपी युती होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी केला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीमुळे बहुमत गमावल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी (२९ जून) रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाने ३९ आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे, असे सांगितले. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रात्री शिवसेनेची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्याने उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी बुधवारी रात्रीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यासोबतच त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनाच सत्तेबाहेर फेकली गेली. या बंडखोरीची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे. या बंडखोरीबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना खडसे यांनी शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोटही केला आहे.

खडसे म्हणाले, आजपर्यंतचा इतिहास आहे की, एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली नाही. ठाकरे सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली. त्यामुळे त्यांचा निर्णय पूर्वीपासून भाजपसोबत जाण्याचा होता. त्याचप्रमाणे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अनेकदा शिवसेनेवर खालच्या पातळीवरचे आरोप केले. मात्र, याला जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही. गुलाबराव पाटील यांनी कधीही गिरीश महाजन यांच्यावर टीका केली नाही. या दोन्ही गोष्टींवरून असे सिद्ध होते की, या बंडखोर आमदारांच्या मनात आताच नव्हे तर पूर्वीपासूनच भाजपसोबत जाण्याचा विचार होता आणि तेच आता जगासमोर आले आहे.

राज्यपालांवर साधला निशाणा
भाजपचे नेते मंगळवारी राज्यपालांना भेटले आणि महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यपालांनीही तत्काळ अधिवेशन बोलवण्याची सूचना सरकारला केली. मात्र, राज्यपालांनी जी तत्परता आता दाखवली तीच तत्परता महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या १२ आमदारांची नावे मंजूर करण्याबाबत दाखवली नाही. गेल्या दोन वर्षात १२ आमदारांची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केली होती. ती यादी तत्परतेने मंजूर केली असती तर राज्यपालांबद्दलचा आदर वाढला असता, असा टोला खडसे यांनी लगावला आहे.

Share