नवी दिल्ली : भारतातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आज पुन्हा एकदा वाढवून सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिला आहे. आज घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने गॅस सिलिंडरच्या दरवाढीसंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहोचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे, तर व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. १ जुलै रोजी दिल्लीमध्ये १९ किलोच्या म्हणजेच व्यावसायिक वापरातील गॅस सिलिंडरच्या किमती १९८ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या, तर १ जून रोजी व्यावसायिक वापरातील गॅस सिलिंडरच्या किमती १३५ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.
१ एप्रिल रोजी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यावेळी सिलिंडरची किंमत २ हजार २५३ रुपयांपर्यंत गेली होती, तर १ मार्च रोजी एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नव्याने गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
Domestic 14.2 kg LPG cylinder's prices increased by Rs 50/cylinder with effect from today. Domestic LPG cylinder will now cost Rs 1053 in Delhi. 5kg domestic cylinder price increase by Rs 18/cylinder. 19kg commercial cylinder prices decreased by Rs 8.50.
— ANI (@ANI) July 6, 2022
गॅस सिलिंडरची कुठे किती किंमत?
दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत २०२१ रुपये होती. आज त्यात ८ रुपये ५० पैशांनी वाढ झाली असून, आता दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरचे दर २०३० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कोलकात्यामध्ये सिलिंडरच्या किमती आता २१४९, मुंबईत १९९० रुपयांवर, तर चेन्नईमध्ये २१९५ रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. जूनमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. पहिल्यांदा ७ मे रोजी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती तर १९ मे रोजीही घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.
असे आहेत घरगुती सिलिंडरचे दर
मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर आता १ हजार ५२ रुपये ५० पैशांना उपलब्ध होईल, तर कोलकात्यामध्ये हाच दर १ हजार ७९ रुपयांपर्यंत गेला आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरचे दर १ हजार ६८ रुपये ५० पैसे इतका असल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे.
वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडर २१८.५० रुपयांनी महागला
दिल्लीत गेल्या एका वर्षात घरगुती सिलिंडरचा दर ८३४.५० रुपयांवरून आता १०५३ रुपयांवर पोहोचला आहे. १४.२ किलो घरगुती सिलिंडरच्या दरात १९ मे २०२२ रोजी ४ रुपयांची वाढ करण्यात आली होती. यापूर्वी ७ मे रोजी दिल्लीत सिलिंडरचा दर ९९९.५० रुपये होता. ७ मे रोजी एलपीजी सिलिंडर २२ मार्च २०२२ रोजी ९४९.५० रुपयांच्या तुलनेत ५० रुपयांनी महागला. २२ मार्चलाही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ८९९.५० रुपये होते.