भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शरद पवार यांना खोचक टोला

पुणे : राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने एकत्रित येत नवे सरकार स्थापन केले आहे. या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, असे म्हणावे लागते. तसेच काल एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे पवारसाहेब जे म्हणतात, त्याच्या उलट त्यांना म्हणायचे असते, असे आ. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने एकत्रित येत नवे सरकार स्थापन केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील हे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यांनतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे सरकार भाजपचे की, बंडखोरांचे? देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का? या प्रश्नांवर बोलताना आ. पाटील म्हणाले, बंडखोर हा शब्दच चुकीचा आहे. हे सरकार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे आहे. भाजपमध्ये कुठलीही नाराजी नाही. हिंदुत्वाचे रक्षण करणारे आणि विकास कामांना चालना देणारे हे सरकार आहे. त्यामुळे भाजपमधील प्रत्येक नेता, पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रचंड खूश आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडावे, असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होते. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन झाल्याने प्रत्येकाला आनंद झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

याआधी राज्यात जे सरकार होते ते हिंदुत्वविरोधी, विकासविरोधी, विकास काम ठप्प करणारे, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, कोणतीही चूक नसणार्‍यांना तुरुंगात टाकणारे असे एक महाभयानक सरकार बर्‍याच वर्षांनी कृत्रिम युती करून सत्तेत आले होते. ते सरकार देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्या अथक प्रयत्नामुळे कोसळले आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच हिंदुत्वाचे रक्षण करणार, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरातील पूरपरिस्थितीबाबत पाटील म्हणाले, मी एक महिन्यापूर्वी या प्रश्नावर आवाज उठवला होता. प्रशासनासोबत बैठकदेखील घेतली होती. परमेश्वराच्या कृपेने तिथे पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, अन्यथा हजारो संसार उद्धवस्त होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून, कोल्हापूर येथे एनडीआरएफचे पथक पाठवण्यात आले आहे.

Share