अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीपाची कापणी तोंडावर असताना मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. विरोधी पक्षाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामी विशेष लक्ष घालावे, पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधववारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. शिवाय सध्या सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगामही धोक्यात आल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सर्व स्तरांवरील रेल्वे अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली असून रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांचीही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता तत्काळ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करावा, असे आवाहन पवार यांनी केले.

Share