राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा

मुंबई : राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज केली.

यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुध्दा धोक्यात आला असल्याचं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रश्नांकडे सुध्दा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.

जून महिन्यापासून आज अखेर राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे. या अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतीचे मोठे नुकसान खरिपाचे संपूर्ण पीक गेले असून रब्बी हंगामातील पेरणी केलेले पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही तरी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी, असं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Share