राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : शरद पवार

मुंबई : एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यातून वक्तव्य करून आपले मत व्यक्त करते तेव्हा ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहा महिन्यांमधून एखादे विधान करत आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यामध्ये झालेल्या ‘उत्तर’ सभेत शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. या टीकेला पवार यांनी आज (बुधवार) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत बोलताना माझ्यावर काही पोरकट आरोप केले. मला त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांचे वाचन कमी आहे, त्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांच्या भाषणातून समाजात दुही निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहे; पण महाराष्ट्रातील सुजाण जनतेने त्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करावे. सामान्य जनतेच्या जीवन मरणाचा यक्ष प्रश्न समोर असताना त्यांच्याबाबतीत राज ठाकरे बोलले नाहीत. कालच्या सभेत राज ठाकरे यांनी महागाई, बेरोजगारी अशा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबद्दल अवाक्षरही काढले नाही, महागाईबाबत राज ठाकरे गप्प का? राज ठाकरेंनी काहीतरी बालिश पद्धतीने भाषणात उल्लेख केला. त्याच्यावर काय उत्तर द्यायचे ? अजित पवार-सुप्रिया सुळेंबद्दलचा आरोप राजकीय नसून पोरकट आरोप आहे. मी आणि अजित पवार काय वेगळे आहोत का? असा सवाल यावेळी शरद पवार यांनी केला.


राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत दिलेल्या अल्टीमेटमवर बोलताना पवार म्हणाले, राज ठाकरेच्या या वक्तव्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल. महागाई, विकास इत्यादी प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी देशात धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. देशात सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांप्रदायिक विचाराला प्रोत्साहन देण्याचे चित्र सध्या दिसत आहे. लोकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन पवार यांनी केले.
शरद पवार हे आपल्या भाषणामध्ये नेहमी फुले-शाहू-आंबेडकर यांचं नाव घेतात, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाहीत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यावर बोलताना पवार म्हणाले की, दोनच दिवसांपूर्वी मी यवतमाळ येथे केलेल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या योगदानावर २५ मिनिटे बोललो आहे. मी दररोज सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचतो. काहीजण सकाळी वृत्तपत्र न वाचताच वक्तव्य करत असतील तर त्याविषयी मी काय बोलणार? मला सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र आणि पुस्तकं वाचायची सवय आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते; पण राज ठाकरे यांना सकाळी वृत्तपत्रातील गोष्टी वाचायला मिळाल्या नसतील. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने माझ्याबाबत काही वक्तव्य केले असेल तर मी त्यांना दोष देत नाही, असा खोचक टोला पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला. शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव मी भाषणांमध्ये घेतो याचा मला अभिमान आहे. कारण या तीनही महापुरुषांनी शिवछत्रपतींचे विचार पुढे नेण्याचे काम केले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जातीयवादी भूमिकेतून टीका केल्याचा राज ठाकरेंच्या आरोपाला उत्तर देताना पवार म्हणाले, होय, माझा पुरंदरे यांच्या विचारांना विरोध होता. कारण शिवरायांना घडवण्यामध्ये जिजामातांपेक्षा दादोजी कोंडदेव यांचे योगदान होते, अशी मांडणी त्यांनी केली होती. मात्र, मला ही मांडणी मान्य नाही. कारण शिवाजी महाराजांनी जे काही कर्तृत्व गाजवले, त्यांना घडवण्यात जिजामातांचे मोठे योगदान होते. दुसरीकडे जेम्स लेन याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लेखन केले आणि या लिखानात मला बाबासाहेब पुरंदरेंची मदत झाल्याचे त्याने स्वत:च सांगितले होते. पुरंदरे यांनीही कधी याबाबत खुलासा केला नाही. त्यामुळे माझे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत मतभेद होते आणि मला त्याचे आजही दु:ख नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पक्ष असा आहे, ज्याचे नेतृत्व सुरुवातीला छगन भुजबळांच्या हातात होते. राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्र अध्यक्ष छगन भुजबळ होते. मग मधुकर पिचड यांच्याकडे अध्यक्षपद होते. ज्या पक्षात नेतृत्वाच्या जबाबदार जागांवर असे लोक आहेत, अशा पक्षाला जातीयवादी ठरवणाऱ्या प्रश्नावर उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही.

मी माझ्या देवधर्माचं प्रदर्शन करत नाही
राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात मी नास्तिक असल्याचा उल्लेख केला; पण मी माझा धर्म आणि देव याबद्दल प्रदर्शन करत नाही. मी आजपर्यंत १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो असेन. माझ्या निवडणूक प्रचाराचा नारळ कोणत्या मंदिरातून फुटतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा; पण आम्ही कधीही त्याचा गाजावाजा केला नाही. तसेच आयुष्यात माझ्यासमोर काही आदर्श आहेत. त्यापैकी प्रबोधनकार ठाकरे, हे एक आहेत. त्यांचे लिखाण वाचले की, तुम्हाला काही गोष्टी समजतील. प्रबोधनकार ठाकरे यांनी देव किंवा धर्म यांच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांवर प्रचंड टीका केली होती. याचा अर्थ त्यांनी धर्माचा अनादर केला नाही; पण देव आणि धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांना चोपण्याचं काम प्रबोधनकारांनी केले. आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचतो. पण सर्वचजण किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक, ते वाचत नसावेत, असा टोला शरद पवार यांनी राज यांना लगावला.

मी ऐन वेळी भूमिका बदललेली नाही
सोनिया गांधींनी देशाचे पंतप्रधान व्हावे की नाही, या मुद्द्यावर माझे मत जाहीर होते; पण मला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की, सोनिया गांधींनी स्वत:हून पंतप्रधानपदाची उमेदवार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर हा प्रश्न संपला. सोनिया गांधींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आमचा वादाचा विषयच राहिला नाही. त्यानंतर एकत्र येऊन काहीतरी करावे, अशी सूचना अन्य सहकाऱ्यांनी केल्यानंतर आम्ही एकत्र आलो, आजही आहोत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना एकच आहेत. त्यामुळे ही भूमिका मी काही ऐन वेळी बदललेली नाही. बिगर भाजपा पक्षांची मोट काँग्रेसला सोबत घेऊनच बांधावी लागेल. काँग्रेसला सोडून अशी आघाडी केली तर ते योग्य होणार नाही, अशी माझी भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वर्षा’ तून बाहेर पडत नाहीय, या आरोपावर पवार म्हणाले, मी अनेक राज्यांत बघतो की, मुख्यमंत्री अनेकदा घरी बसून निर्णय घेतात. घरी दुसरे कार्यालय असते. आपल्याकडे ‘वर्षा’ वर तसे आहे. ते आले-नाही आले यामुळे राज्याचा कारभार थांबलेला नाही. त्यांच्याकडे ज्या फाईल्स जातात त्यावर वेळेवर निर्णय होतात. त्यांच्या आरोग्याचे काही प्रश्न होते. ते कमी होऊन आता मुख्यमंत्री मंत्रालयात आले याचा मला आनंद आहे.

Share