गुणरत्न सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वादग्रस्त ठरलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर ८ एप्रिलला झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (रविवार) बारामतीत कामगारांनी निषेध रॅली काढली. यावेळी कामगार नेते तुकाराम चौधर यांनी, गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्यास रोख ११ लाख तर त्यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्या महिलेला ५ लाख रुपये आणि तोंडाला काळे फासणाऱ्याला ५१ हजारांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज बारामती येथे कामगारांनी निषेध रॅली काढली होती. पेन्सिल चौकापासून ही रॅली निघून पुन्हा पेन्सिल चौकात तिचा समारोप झाला. तालुका पोलिस ठाण्यासमोर झालेल्या सभेत अनेक कामगार नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या रॅलीच्या समारोपाप्रसंगी गुणरत्न सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्याला ११ लाख तर बांगड्या भरणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ५ लाखांचे बक्षीस कामगार नेते तुकाराम चौधर यांनी जाहीर केले. दरम्यान, शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सध्या अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ आज बारामती येथे एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कमधील महिलांनी ठिय्या आंदोलन केले.

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीविरोधात तसेच वैद्यकीय कर्मचा-यांच्या पगारवाढीला गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल करत विरोध केला होता. जी व्यक्ती पगारवाढीला न्यायालयात जाऊन विरोध करत असेल ती कामगारांच्या हितासाठी काय न्याय मिळवून देईल, असा सवाल नानासाहेब थोरात यांनी याप्रसंगी उपस्थित केला. या सभेत तानाजी खराडे, भारत जाधव, नाना बाबर, राहुल बाबर, तुकाराम चौधर, राहुल देवकाते, गुरुदेव सरोदे, सचिन चौधर, भाऊ ठोंबरे, भारत जाधव, गजानन भुजबळ, अमोल पवार, गुरुदेव सरोदे, राहुल बाबर, आनंद भापकर, राहुल देवकाते, प्रकाश काटे, खंडू गायकवाड, अनिल वाघ, मनीषा निंबाळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. या रॅलीनंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन देण्यात आले. ग्रीव्ह्ज कॉटन अँड अलाईड कंपनीज एम्प्लॉएज युनियन, पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि., पुना एम्प्लॉईज युनियन, त्रिमूर्ती इ.प्रा.लि., भारतीय कामगार सेना, सुयश ॲटो. श्रायबर डायनामिक्स डेअरी, इन्सोफर, भारत फोर्ज, बाारमती दूध संघ कामगार कृती समिती आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Share