औरंगाबाद : बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचं चित्र आहे. कांद्याला सध्या २ रुपये ते ८ रुपयांचा दर मिळत आहे तर दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पैठण येथील बाजार समितीत कांद्याला अवघे १ रुपया किलोचा भाव मिळाला.
उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाल्यापासून दरात घट होत होती. पण वाहतूक आणि चार पैसे पदरात पडतील अशी स्थिती कांद्याच्या दराची होती. पण गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या आवकमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी याच बाजार समितीमध्ये 200 ते 900 असा दर होता. मात्र, आवकमध्ये सातत्या राहिल्याने 240 रुपये क्विंटलहून कांदा थेट 100 रुपये क्विंटलवरच येऊन ठेपला आहे. कांद्याच्या दर्जानुसार दर असले तरी सर्वाधिक दर 800 तर सर्वात कमी 100 रुपये क्विंटल ही कांद्याची अवस्था झाली आहे.