कितीही हल्ले करा, ‘मविआ’चा भ्रष्टाचार बाहेर काढणारच!

मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पोलखोल अभियानाला सुरुवात होणार होती. मात्र, त्याआधी अज्ञात व्यक्तींनी या अभियानासाठी तयार केलेल्या प्रचार रथाची तोडफोड केली. यावर माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही हल्ले करा, आम्ही महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच आहोत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपच्या पोलखोल अभियानाची आज मंगळवारी (१९ एप्रिल) सकाळी ११ वाजता मुंबईतील चेंबूर कॅम्प येथून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात होणार होती. मात्र, त्याआधीच सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी या अभियानासाठी तयार केलेल्या गाडीवर (प्रचार रथ) दगडफेक करून तोडफोड करत नुकसान केले. त्यानंतर आज पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भ्रष्टाचार करणारे अस्वस्थ आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले करताहेत. तोडफोड करुन आम्ही अभियान थांबवू, असे त्यांना वाटत असेल; पण आमचे अभियान दुप्पट वेगाने सुरू ठेवू. आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणे अपेक्षितच आहे. ज्या प्रकारे यांचा बुरखा फाटतो आहे, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय. पहिल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यातूनच ते असा प्रयत्न करत आहेत; पण त्यांनी काहीही केले तरी आमची पोलखोल यात्रा थांबणार नाही. आम्ही यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर कितीही हल्ले करा, आम्ही महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच आहोत.

आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणार, असे म्हणताच त्यांनी तोडफोड केली. मला एका गोष्टीचे समाधान आहे, आमचा घाव सत्ताधाऱ्यांच्या वर्मी बसला आहे; पण मला त्यांना सांगायचेय, कितीही हल्ला करा, आम्ही भ्रष्टाचाराची पोलखोल करतच राहू. खरे हिंदुत्व कुणाच्या रक्तात आहे, हे आता साऱ्यांना कळले आहे, अशा आक्रमक शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली. दरम्यान, भाजपच्या पोलखोल अभियानाच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांची ओळख पटली आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

कांदिवलीमध्ये पोलखोल सभेच्या स्टेजची तोडफोड

याआधी मुंबईतील कांदिवली होणाऱ्या भाजपच्या पोलखोल सभेच्या स्टेजची तोडफोड करण्यात आली होती. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनसमोर आज संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी उभारलेल्या स्टेजची मध्यरात्री एकच्या सुमारास तोडफोड करण्यात आली. याबाबत भाजपाआमदार अतुल भातखळकर म्हणाले, सोमवारी आम्ही गोरेगाव येथील पत्रा चाळ येथे प्रचाराला सुरुवात केली. समोर शिवसेनेची शाखा होती, त्यामुळे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला. आम्ही पोलिसांशी बोललो असून, पोलिसांच्या परवानगीने कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ स्टेज उभारण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

Share