मुंबई : बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा या महिलेला मुंबई पोलिसांनी इंदौरमधून अटक केली आहे. दरम्यान, मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रेणू शर्माला शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनीदेखील आरोप करून मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. रेणू शर्मा ही महिला मूळची मध्य प्रदेशातील इंदौर येथील असून, ती करुणा शर्माची बहीण आहे. रेणू शर्मा हिच्याविरुद्ध यापूर्वीही ब्लॅकमेलिंगच्या अनेक तक्रारी विविध पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होता. धनंजय मुंडे यांनी रेणू शर्माविरुद्ध मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई गुन्हे शाखा आणि इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली. त्यानंतर रेणू शर्मा हिला इंदौर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने रेणू शर्मा हिचा ताबा मुंबई पोलिसांना दिला. यानंतर तिला मुंबईत चौकशीसाठी आणण्यात आले. आता पोलिस रेणू शर्मा हिची चौकशी करतील. या चौकशीतून कोणती नवी माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय?
धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, रेणू शर्मा हिने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र, काही दिवसानंतर तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेन, अशी धमकी या रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना दिली होती. या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले होते. तसेच एक महागडा मोबाईलही पाठवला होता. मात्र, त्यानंतरही या रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांसाठी तगादा लावला होता. ही महिला आपल्या ओळखीची असल्याचे धनंजय मुंडे यांनी तक्रारीत स्पष्ट केले होते.
‘पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी. अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी. अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?’ अशा आशयाचा मेसेज रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना पाठवला होता. याचे पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांना दिले होते.