मुंबई : मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटींची एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केला आहे.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच निवडणुकीची तारीख एसटी महामंडळाकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, मागील पाच महिने संपात सहभागी असलेल्या कर्जदार सदस्यांना वेतन नसल्याने त्यांचे बँकेचे हप्ते थकले आहेत. अशा थकबाकीदारांना मतदानाचा हक्क नसल्याचा फतवा काढण्यात आला आहे, असे आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले!
आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, एसटी महामंडळाचे जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच या बँकेचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. १९९५ साली इंटकला हाताशी धरून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीसच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाच्या नावाखाली ५०० रुपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम अशा वेगवेगळ्या मार्गाने जवळपास १०० कोटी रुपये गिळंकृत केले. त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलिशान गाड्या खरेदी करून दिल्या, असा आरोप आ. पडळकर यांनी केला आहे.
अशा प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार
एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशीपोटी लढा देत होता तेव्हा इंटक संघटेनेचे सर्वेसर्वा असलेल्यांनी माणुसकीपोटी आपल्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावरून एक वेळचे जेवण सोडा पण साधे चहापाणीसुद्धा पाठवले नाही. त्यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मोगलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या त्यांचा डाव उधळून लावणार आहोत, असे आ. पडळकर म्हणाले.