देवेंद्र फडणवीसांची १ मे रोजी ‘बूस्टर डोस’ सभा

मुंबई : महाराष्ट्र दिनी १ मे रोजी भाजपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला भाजपने ‘बूस्टर डोस’ सभा असे संबोधले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी ‘बूस्टर’ तसेच शिवसेनेसह महाविकास आघाडीला उत्तर (डोस) देण्यासाठी ही सभा असेल, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आ. आशिष शेलार म्हणाले, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपच्या वतीने रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खरे तर कोरोनानंतर केवळ भाजपने मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या आणि मुंबईकरांची संस्कृती सांगणाऱ्या सोहळ्याचे आयोजन केले आहे. मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील शक्ती केंद्रप्रमुख आणि बुथ प्रमुख आणि हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

त्याचबरोबर या सोहळ्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ‘बूस्टर डोस’ सभा होणार आहे. ‘बूस्टर डोस’ सभा यासाठी की, याद्वारे भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘बूस्टर’ तर शिवसेनेसह महाराष्ट्र विकास आघाडीला ‘डोस’ देण्यात येणार आहे. कडकडीत डोस असलेल्या अशा तडाखेबंद भाषणाचा कार्यक्रम यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र अनुभवेल, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.

Share