खुलताबादेतील औरंगजेबच्या कबरीवर जाण्यास बंदी; पुरातत्त्व विभागाचा आदेश

औरंगाबाद : खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीवर एमआयएमचे नेते नतमस्तक झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्या व्यक्तीने क्रूरता केली अशा औरंगजेबची कबर हवीच कशाला, असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थात मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पुढील पाच दिवस कबरीवर कोणासही जाता येणार नाही, असा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी बजावला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर सध्या चर्चेत आहे. एआयएमआयएमचे नेते आणि तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले आणि चर्चेला उधाण आले. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेण्याचा काय संबंध? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. शिवसेनेने याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर औरंगजेबची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला, असाही सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता.

औरंगजेबची ही कबर येथे हवीच कशाला, असा प्रश्न हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी विचारला होता. आता पुन्हा तोच प्रश्न मनसेकडून विचारला गेला, असे औरंगजेबच्या कबरीच्या वादाविषयी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले. औरंगजेबच्या कबरीकडे कोणी फिरकतच नाही. मुस्लिम लोकही जात नाहीत. नाहक चर्चा करण्यात अर्थ नाही, असे म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचा समाचार घेतला होता.

खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीच्या वादात आता मनसेने उडी घेतल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने पुढील पाच दिवस या कबरीवर कोणालाही जाण्यास मनाई केली आहे. तसा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी जारी केला आहे. दरम्यान, खुलताबाद येथील औरंगजेबची कबर खोदल्याची अफवा पसरविण्यात आल्याने त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. हा विशेष बंदोबस्त नाही; पण काळजी घेतली जात असल्याचे पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी सांगितले.

Share