राज्यात लवकरच होणार पोलिस भरती; ७ हजार पदे भरणार

मुंबई : राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच पोलिस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच यासंबंधीची जाहिरातदेखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृह खात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ७ हजार पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया झाल्यानंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना काळात राज्यातील पोलिस भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्षे कोणतीही पोलिस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलिस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलिस भरतीकडे लागले होते. अखेर महाविकास आघाडी सरकारने कोरोनाची लाट ओसरल्यानंतर उशिरा का होईना पण ७ हजार पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

५२०० पदांची भरती अंतिम टप्प्यात
राज्यातील विविध पोलिस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांमधील २०१९ च्या भरती प्रक्रियेनुसार ५२०० पदांची भरती होणार होती. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू होत आहेत.

अधिवेशनात पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता प्रश्न

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस भरतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात ५२०० पदांची भरती सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात ७२०० पोलिस कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. राज्यातील पोलिसांचे बळ कमी आहे. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची ५० हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असेही वळसे पाटील म्हणाले होते.

Share