सोनिया गांधींनी १८ वर्षांपूर्वी दिलेला शब्द मोडला; काँग्रेस नेत्या नगमा नाराज

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यानंतर काही तासांतच काँग्रेसमधील नाराजी बाहेर येताना दिसत आहे. काँग्रेस नेत्या आणि चित्रपट अभिनेत्री नगमा यांनी उघडपणे प्रतापगढी यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे. १८ वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्याला राज्यसभा सदस्य करण्याचे आश्वासन दिले होते; पण ते त्यांनी पाळले नाही, असे नगमा यांनी म्हटले आहे. ‘राज्यसभेसाठी मी कमी पात्र आहे का?’ असा सवाल विचारत १८ वर्षांची तपस्या व्यर्थ ठरल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातून राज्याबाहेरील नेत्यांना राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उत्तर प्रदेशमधील नेते इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. प्रतापगढी यांना महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचे तिकीट दिल्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. नगमा यांनी पहिल्या ट्विटमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचे ट्विट रिट्विट करत आपली १८ वर्षांची तपस्या इम्रान भाईंसमोर कमी पडल्याचे म्हटले आहे. पवन खेरा यांनी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये कदाचित माझी तपस्या काहीशी कमी पडल्याचे म्हटले होते.

मी राज्यसभेसाठी पात्र नाही का?
नगमा यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी २००३-०४ काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेतही नव्हता. आता या गोष्टीला १८ वर्षे झाले आहेत. मात्र, त्यांना अद्याप एकही संधी सापडलेली नाही. इम्रान यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. मी पात्र नाही का? मी कमी लायक आहे का? असा माझा सवाल आहे.” नगमा यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.

कोण आहेत नगमा?
५२ वर्षीय नगमा यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांतही काम केले आहे. १९९० मध्ये सलमान खानसोबत ‘बागी’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘लाल बादशाह’, ‘सुहाग’, ‘कुंवारा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. २००७ मध्ये त्या ‘थांब लक्ष्मी थांब’ या मराठी सिनेमातही झळकल्या होत्या.

२००४ मध्ये नगमा भाजपच्या तिकिटावर हैदराबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा होती. मात्र, अचानक त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. २०१५ मध्ये महिला काँग्रेसच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या वर्षी त्यांना मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

कोण आहेत इम्रान प्रतापगढी ?
नगमा यांची प्रदीर्घ तपश्चर्या ज्यांच्यासमोर फिकी ठरली, ते इम्रान प्रतापगढी कोण आहेत? असा सवाल उपस्थित झाला आहे. ३४ वर्षांचे मोहम्मद इम्रान प्रतापगढी हे उर्दू भाषिक कवी आहेत. ते उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आहेत. प्रतापगढी हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. भारत आणि जगाच्या इतर भागांतील मुस्लिम अनुभव आणि अस्मिता यांचे वर्णन करणार्‍या निषेधात्मक काव्यासाठी इम्रान प्रतापगढी ओळखले जातात. ते विशेषतः “मदरसा” आणि “हाँ मै कश्मीर हूं” या उर्दू नझ्मसाठी लोकप्रिय आहेत.

इम्रान प्रतापगढी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुरादाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, त्यांचा दणकून पराभव झाला होता. त्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार ६ लाख ४९ हजार ५३८ मतांनी विजयी झाले, मात्र प्रतापगढी तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले. त्यांना केवळ ५९ हजार १९८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर ३ जून २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभेतील पराभवानंतर आता राज्यसभेवर प्रतापगढी यांचे पुनर्वसन होताना दिसत आहे.

आपले मत मांडण्याचा सर्वांना अधिकार –नाना पटोले

दरम्यान, काँग्रेसच्या वतीने इम्रान प्रतापगढी यांनी सोमवारी (३० मे) मुंबईतील विधानभवनात राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इम्रान प्रतापगढी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी नगमा आणि पवन खेरा यांनी आपली १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचे सांगत नाराजी जाहीर केल्याबद्दल विचारले असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मी श्रेष्ठ आहे असे मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांनी मांडले असेल. व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. भाजपने उमेदवार दिलेले आहेत आणि तिथेही कुरघोडी आहे; पण तिथे लोकशाही नाही, मत मांडण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे मांडले असेल. कारण त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. संधी मिळाली पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. हा पक्षीय स्तरावरील प्रश्न नाही, असेही पटोले यांनी सांगितले.

Share