पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर बदनामीकारक मजकूर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनसेच्या १६ कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ॲड. पूनम गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आणखी सहाजणांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असा ग्रुप तयार करण्यात आला होता. ॲड. पूनम गुंजाळ यांना समुहात सहभागी होण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. ॲड. गुंजाळ यांनी मैत्रीची विनंंती स्वीकारल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे यांचे छायाचित्र वापरून बदनामीकारक मजकूर टाकल्याचे आढळून आले. त्यानंतर ॲड. गुंजाळ यांनी महिलांविषयी बदनामीकारक मजकूर टाकू नका, असे समुहावर सांगितले.
सुधीर लाडने त्याच्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवरून एक ध्वनीचित्रफित प्रसारित करून शिवीगाळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ॲड. गुंजाळ यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मनसेच्या १६ कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद करीत आहेत. दरम्यान, लवकरच आम्ही सर्व महिला एकत्र येऊन विकृतांच्या घरी जाऊन जोडे मारून सत्कारही करणार आहोत,” असा इशारा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबुकवरून दिला आहे.