राज ठाकरेंच्या अल्टिमेटमबाबत राज्याचे गृह खाते सक्षम : सुप्रिया सुळे

ठाणे : मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला असला तरी ठाकरे यांच्या अल्टिमेटमबाबत राज्याचे गृह खाते सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे आज शुक्रवारी (२९ एप्रिल) ठाण्यात आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. एक खासदार म्हणून आपल्याला खूप कामे असून, भोंगे आणि हनुमान चालिसापेक्षा इंधन दरवाढ आणि महागाईचे मोठे आव्हान असल्याचे सांगत त्यांनी थेट नाव न घेता भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.

मशिदीवरील भोंगे आणि नवनीत राणा यांच्या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता, खा. सुळे यांनी उत्तर देणे टाळले. मात्र, महागाई विरोधात त्यांनी भाजपवर टीका केली. मशिदी आणि भोंग्यापेक्षा सध्या महागाईचे मोठे आव्हान असून, या विरोधात संसदेतदेखील अनेक वेळा आवाज उठवला असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोणत्या सरकारचा टॅक्स जास्त आहे हे सर्वाना कळेल. जीएसटीच्या माध्यमातून राज्याला मिळणारे पैसे उशिरा मिळत असून, याविरोधातसुद्धा संसदेत केंद्र सरकारचे लक्ष वेधले असल्याचे त्या म्हणाल्या. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सावध भूमिका घेत उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास
एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या पाठीमागे कोण आहे ? या प्रश्नावर खा. सुप्रिया सुळे यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, महाराष्ट्र पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असून, तपासानंतर यातील सत्य बाहेर येईल. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य नसल्याचे सुळे यांनी सांगितले. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर अन्यायच झाला असल्याचे सांगून या दोघांवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये सातत्य नसल्याचे सांगत सुळे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली.

गणेश नाईक प्रकरणात पीडित महिलेला मदत करणार
भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या प्रकरणावर बोलण्यापेक्षा पीडित महिलेला मदत करणार असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले. कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर अशा प्रकारे आरोप झाले तरी यामध्ये मुले भरडली जातात. त्यामुळे केस कोणतीही असो, न्याय मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश नाईक प्रकरणात आपण प्रत्यक्ष बोलणार नाही. मात्र, मदत मागायला कोण आले तर मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share