गुगलच्या जाहिरात धोरणाची दुसऱ्यांदा चौकशी सुरू

लंडन : गुगलच्या जाहिरात धोरणावर (अ‍ॅडटेक) पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, इंग्लंडमधील स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाने (कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अ‍ॅथॉरिटी अर्थात सीएमए) गुगलचे जाहिरात धोरण तसेच ते कसे वापरले जाते? याची दुसऱ्यांदा चौकशी सुरू केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गुगल आणि फेसबुकची मातृकंपनी ‘मेटा’ यांच्यातील ‘जेडी ब्लू’ कराराच्या चौकशीतर ‘सीएमए’ने ही नवीन चौकशी सुरू केली आहे. यामुळे गुगल अडचणीत आले आहे.

गुगल ही एक अमेरिकेतील एक खूप मोठी बहुराष्टीय कंपनी आहे. जी इंटरनेटची सेवा देण्याचे आणि जाहिरातदारांसाठी त्यांच्या वस्तू तसेच उत्पादनाविषयी ऑनलाईन जाहिरात प्रकाशित करण्याचे, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअर सेवा पुरविण्याचे देखील काम करते. गुगल हे इंटरनेटवरील सर्वांत जास्त लोकप्रिय शोधयंत्र संकेतस्थळ आहे. जगभरातील अनेक देशांमधील सरकारे गुगलवरील नियमन कठोर करीत आहेत. अमेरिका आणि युरोपियन युनियनसह जागतिक स्तरावर त्यांच्या बाजाराच्या स्थितीबद्दल अनेक चौकशा सुरू आहेत. गुगल आणि फेसबुक यांना त्यांचे वर्चस्व वापरून छोट्या कंपन्यांना हुसकावून लावता येऊ नये तसेच त्यांना ग्राहकांचे नुकसान करण्यापासून रोखण्यासाठी इंग्लंडने गेल्या वर्षी नवीन स्पर्धा व्यवस्था लागू केली होती.

या निर्णयामुळे ‘सीएमए’मध्ये एक समर्पित डिजिटल मार्केट्स युनिट तयार करण्यात आले. यामुळे टेक फर्म्सनी घेतलेले निर्णय स्थगित करणे, ब्लॉक करणे आणि परतवून लावण्याचे अधिकार दिले जाऊ शकतात. तसेच त्याचे पालन न केल्यास आर्थिक दंडही आकारला जाऊ शकतो. कंपन्या ग्राहकांचा डेटा कशा प्रकारे वापरतात याबद्दल अधिक पारदर्शक असणे आवश्यक आहे, असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे.

डिजिटल जाहिरातींमध्ये स्पर्धा मर्यादित करून गुगलने कायद्याचे उल्लंघन केले आहे, की नाही याचा तपास करत असल्याचे ‘सीएमए’ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गुगलने डिजिटल जाहिरात क्षेत्रात ‘अ‍ॅडटेक स्टॅक’ म्हणून महत्त्वाचे स्थान व्यापलेले आहे. याद्वारे गुगल प्रकाशक आणि जाहिरातदार अशा दोघांकडूनही फी घेतो. सन २०१९ मध्ये इंग्लंडमधील जाहिरातदारांनी ऑनलाईन जाहिरातींवर १.८ अब्ज डॉलर खर्च केले. ब्रिटनमधील बहुसंख्य लोक ऑनलाईन कंटेन्टचा सर्वाधिक उपयोग करतात, म्हणून जाहिरातदारांनी ही एवढी मोठी रक्कम खर्च केली होती.

गुगलने डिजिटल जाहिरात क्षेत्रात आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेतल्याचा प्राधिकरणाला संशय आहे. यापूर्वी मार्चमध्येही फेसबुक आणि गुगल यांच्यातील कराराची चौकशी केल्याचे इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते. उभय कंपन्यांमधील या कराराला ‘जेडी ब्लू’ असेही म्हटले जाते. याशिवाय, युरोपियन युनियननेही आपण गुगलच्या जाहिरात धोरणाची चौकशी करणार असल्याचे गेल्या वर्षी म्हटले होते. विशेष म्हणजे इंग्लंडमधील २.३ अब्ज डॉलरच्या ऑनलाईन जाहिरात बाजारपेठेतील गुगल हा सर्वात मोठा स्पर्धक आहे.

दरम्यान, अ‍ॅडटेक तंत्रज्ञानातील आपल्या मजबूत स्थितीचा वापर करून गुगल आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नुकसान पोहोचवू शकते. याचा परिणाम आमच्या ग्राहकांवर आणि पर्यायाने त्यांची सेवा घेणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. परिणामी या क्षेत्रातील स्पर्धा कमकुवत होऊ शकते आणि प्रकाशकांच्या जाहिरातींच्या महसुलातही घट होऊ शकते. यामुळे त्यांना खर्चात कपात करावी लागू शकते किंवा त्यांची सामग्री (कंटेन्ट) ‘पेवॉल’च्या (पैसै दिल्याशिवाय कंटेन्ट पाहता येणार नाही.) मागे ठेवण्यास भाग पाडले जाऊ शकते किंवा मग सामग्रीच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागू शकते, अशी आम्हाला शंका आहे, असे ‘सीएमए’चे मुख्य कार्यकारी आंद्रिया कोसेली यांनी म्हटले आहे.

Share