आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चे आयपीएलच्या अंतिम सामन्यात होणार ट्रेलर लाँच

आयपीएल स्पर्धेचा १५ वा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. ‘प्ले ऑफ’ मधील चार संघदेखील निश्चित झाले आहेत. पुढील आठवड्यात ‘प्ले ऑफ’ चे सामने होणार असून, २९ मे रोजी अंतिम सामना होणार आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी आमिर खानने एक नवी युक्ती लढवली आहे. यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आयपीएलमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट असेल.

अभिनेता आमिर खान गेल्या तीन दशकांपासून चित्रपट सृष्टीत सक्रिय आहे. आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी जीव ओतून मेहनत घेतो. एकाच चित्रपटावर अधिक काळ आणि परफेक्ट काम करणे ही आमिर खानची खासियत आहे. आपली भूमिका रुपेरी पडद्यावर अगदी प्रेक्षकांना आपल्यातली वाटावी म्हणून तो अनेक प्रयत्न करतो. त्याची मेहनत प्रत्येकवेळी त्याच्या चित्रपटांमधून पाहायला मिळते. आमिर खानचा आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचे सध्या तो जोरदार प्रमोशन करत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. आता यासाठी प्रेक्षकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही असे दिसते. आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार असल्याचे बोलले जात आहे. २९ मे २०२२ रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. त्यावेळी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांसाठी हे मोठे सरप्राईज ठरणार आहे.

चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा पहिलाच मोठा ट्रेलर लाँच सोहळा राहणार असल्याचे बोलले जात आहे. क्रिकेट सामन्याच्या सेकंड हाफमध्ये ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर प्रदर्शित केला जाईल. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट टॉम हॅंक्स यांचा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत ऑफिशियल रिमेक आहे. हा चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आमिर खानबरोबर करिना कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या अगोदर आमिर खान व करिना कपूर-खान ‘३ ईडियट्स’ व ‘तलाश’ या चित्रपटांमध्ये सोबत दिसले होते.

Share