‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार

लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले होते. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, येत्या २७ मे रोजी हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनकार्यावर आधारित हा चित्रपट आहे.

‘मराठीतील महासिनेमा’ असे घोषवाक्य मिरवणाऱ्या या बहुचर्चित चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मराठीतील अभिनेता गश्मीर महाजनी हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका अशी दोन्ही आव्हाने लीलया पेलली आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याचे प्रेक्षकांकडून कौतुक केले गेले.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाविषयी माहिती देताना अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचाही सरसेनापती म्हणून वावरलेल्या हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारताना दडपण येणे साहजिकच होते. त्यासाठी केवळ तसे दिसणे नाही. त्यांचा वावर, त्यांचा पराक्रम हे सर्व त्याच ताकदीने मोठ्या पडद्यावर रंगवणे गरजेचे होते. या चित्रपटासाठी शरीर कमावणे हा महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे त्यासाठी मी खूप मेहनत घेतलीच, त्याचबरोबरीने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण, सराव या दोन्ही गोष्टींसाठी खूप वेळ दिला. चारही पाय हवेत उडवून चालणाऱ्या घोड्यावर बसायचे होते. शिवाय एक तलवार साडेसात किलोची.. अशा दोन हातांत दोन तलवारी घेऊन त्या फिरवायच्या होत्या, त्यासाठी शारीरिक बळ हवेच आणि खूप सरावही केला. आपल्याकडे अजूनही दिसण्याला जास्त महत्त्व दिले जाते. कलाकाराचा चेहरामोहरा बघून तो हिरो आहे की नाही हे ठरवले जाते. मी त्या प्रकारचा हिरो नाही; पण खूप तयारीनिशी मी दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हींचे शिवधनुष्य या चित्रपटात पेलले आहे, असे प्रवीण तरडे म्हणाले.

हिंदीच्या तोडीस तोड भव्य ऐतिहासिक चित्रपट

‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठीतील अतिशय महागडा चित्रपट आहे हे मी ठामपणे सांगतो. या चित्रपटासाठी आम्ही हिंदीतील तंत्रज्ञांना बोलावले होते. ‘बाजीराव मस्तानी’सारख्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी ज्या तंत्रज्ञांनी काम केले तेच या चित्रपटासाठी घ्यायचे हे आधीच ठरवले होते. मराठीतही हिंदीच्या तोडीस तोड भव्य ऐतिहासिक चित्रपट झाला पाहिजे, प्रेक्षकांना पडद्यावर तो भव्य दिसला पाहिजे, त्यासाठी तांत्रिक बाजूत कुठेही कमतरता जाणवू द्यायची नाही, हे मी मनाशी पक्के ठरवले होते, असे सांगतानाच इतका खर्चीक ऐतिहासिकपट चित्रित करताना कलाकारांची पूर्वतयारी किती आणि का महत्त्वाची असते हेही प्रवीण तरडे यांनी उलगडून सांगितले. या चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील यांनीच हंबीरराव मोहितेंवरचा चित्रपट करण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला होता. त्यांनी मी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पाहिला होता. तितकाच भव्य असा चित्रपट त्यांना बनवायचा असल्याने ते माझ्याकडे आले होते. सुरुवातीला आम्ही हंबीररावांच्या भूमिकेसाठी मोठमोठ्या कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या. मात्र, काहींकडे अशा भूमिकेसाठी लागणारी शरीरयष्टी होती, तर अभिनयाचे गणित जमत नव्हते. तर त्याच्या उलट अनुभव इतरांच्या बाबतीत होते. आपल्याकडे बरेचसे कलाकार हे रंगभूमीवरचे आहेत, त्यांना अभिनय उत्तम जमतो. मात्र, कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना आणि खास करून ऐतिहासिक भूमिका साकारत असताना कलाकाराला खूप वेगवेगळ्या पद्धतीची तयारी करावी लागते. तुम्ही घोडय़ावर बसता तेव्हा घोडा आपोआप पुढे जात नाही. तो चालवावा लागतो. त्यासाठी घोडा चालवण्याचे तंत्र शिकावे लागते. ऐतिहासिक चित्रपटातील अभिनय हा पार्ट टाइम करता येत नाही. त्यासाठी पूर्ण वेळ द्यावाच लागतो, हे सारे पाहिल्यानंतर हंबीररावांची भूमिका मी स्वत:च करण्याचा निर्णय घेतला. सव्वा वर्ष मी व्यायाम-प्रशिक्षण, या चित्रपटासाठी ऐतिहासिक संदर्भ शोधून त्याचे कथालेखन करण्यासाठी दिला.

ऐतिहासिक चित्रपटासाठी पूर्वतयारी, सराव आवश्यकच
‘सरसेनापती हंबीरराव’चे छायाचित्रण हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी केले आहे. महेश लिमयेसारखा मराठी तरुण हिंदीत ‘बाजीराव मस्तानी’सारखे ऐतिहासिकपट घडवतो आहे, मग त्यांना आपण मराठीसाठी का बोलावत नाही? तंत्राची म्हणून एक किंमत असते आणि ती भन्साळी असो वा मराठीतील दिग्दर्शक असो, त्यांना तेवढीच किंमत मोजावी लागते. या चित्रपटात तुम्हाला लुटुपुटीची लढाई दिसणार नाही. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात रणवीर सिंग एक मोठी उडी घेऊन युद्ध करताना दिसतो, या चित्रपटात असेच दृश्य माझ्यावर चित्रित झाले आहे, अर्थात ही त्या तंत्रज्ञांची किमया आहे. ‘तानाजी’ चित्रपटात अभिनेता अजय देवगणने जी घोडी वापरली आहे, तीच आम्ही या चित्रपटात वापरली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये वापरले जाणारे हे घोडे चित्रीकरणासाठी आणताना एसी गाडीतून यायचे आणि जायचे, इतका त्यांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट करत असताना खर्चाचे गणित सांभाळायचे असेल तर खूप वेगवेगळ्या पातळीवर पूर्वतयारी करावी लागते. युद्धाचा एखादा प्रसंग कलाकारावर चित्रित होत असेल, त्याच्यामागे तोफगोळे फुटताना, स्फोट होताना दिसणार असतील, तर त्या कलाकाराच्या हालचाली आणि ते स्फोट हे दोन्ही एकाच वेळी बरोबर झाले पाहिजेत. त्या क्षणी कलाकार चुकला तरी मागे स्फोट होणारच असतात. हा एक स्फोट घडवून आणणे ही मोठी खर्चीक बाब असते. एका कलाकाराला रोजच्या दिवसाचे जे वेतन मिळते तेवढा खर्च तो एक स्फोट घडवून आणण्यासाठी लागतो. कलाकाराला परत परत दृश्य द्यावे लागले तर निर्मात्यावरचा आर्थिक भार वाढत जातो आणि मग गणित बिघडते. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट करताना कलाकार. दिग्दर्शक, तंत्रज्ञ कोणालाही चूक करायची मुभा नसते, त्यांना पूर्वतयारी, सराव हा करावाच लागतो, असे प्रवीण यांनी सांगितले.

कलाकारांच्या निवडीसाठी वेगळे प्रयोग

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील कलाकारांची निवड खूप विचारपूर्वक केलेली आहे, काही प्रयोगही करून पाहिले आहेत, असे सांगून प्रवीण तरडे म्हणाले, या चित्रपटात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही भूमिका अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारल्या आहेत. आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत, त्यापैकी एक म्हणजे शिवाजी महाराज हे उंचीने छोटे होते. ते उंचीने लहान दिसायचे; पण ते कोणासमोर.. तर अफझलखानासमोर त्यांची उंची कमी दिसणे हे साहजिक आहे. म्हणून ते उंचीने लहान होते असे म्हणता येत नाही. मी मुद्दाम इथे गश्मीर महाजनी याची निवड केली. त्याची उंची, देहयष्टी, देहबोली हे सगळे लक्षात घेतले. तो घोडेस्वारी उत्तम करतो. त्याच्याबरोबर मी याआधीही काम केलेले असल्याने त्याच्याकडून ही भूमिका कशी करून घ्यायची हे मला पूर्ण माहिती होते. आणखी एक गोष्ट जाणीवपूर्वक केली ते म्हणजे संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचेच अंश होते. त्यामुळे या दोन्ही भूमिका मी गश्मीरकडूनच करून घेतल्या. सोयराबाईंची भूमिकाही या चित्रपटात महत्त्वाची होती, कारण तो काळच तसा होता. शिवाजी महाराज आणि सोयराबाईंचे संबंध, एक आई म्हणून संभाजींऐवजी राजारामांकडे सूत्रं यावीत ही सोयराबाईंची इच्छा ही नाती महत्त्वाची होती. ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात ही भूमिका अभिनेत्री श्रुती मराठे हिने केली आहे. श्रुतीला आतापर्यंत आपण गोड, देखण्या भूमिकेतूनच पाहात आलो आहोत, त्यामुळे सोयराबाईंची वेगळी भूमिका तिला देत मी हा प्रयोग केला.

हंबीररावांना मारणाऱ्या सर्जा खानच्या भूमिकेसाठी मी अभिनेता राकेश बापटची निवड केली. तोही हिंदी-मराठीतला देखणा, नाजूक शरीरयष्टीचा नायक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला या वेळी खलनायकी भूमिका देत एक वेगळा विचार केला, अशी माहिती त्यांनी दिली. अथक मेहनत घेऊन तयार केलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट मराठी ऐतिहासिक चित्रपटांमधील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला.

Share