अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अहमदनगरच्या पुढे घोडेगाव येथे किरकोळ अपघात झाला. ठाकरे यांच्या ताफ्यातील मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीच्या बोनेटचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या महाराष्ट्र दिनी १ मे रोजी (रविवारी) औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी ते आज शुक्रवारी सकाळी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह औरंगाबादकडे रवाना झाले. तत्पूर्वी वाटेत त्यांनी वढू-तुळापूर येथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर माथा टेकवला.
औरंगाबादला जाताना राज ठाकरे यांचे अहमदनगर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी अहमदनगरच्या बायपास चौकातील एका हॉटेलमध्ये जेवण घेतले. त्यानंतर ठाकरे आपल्या ताफ्यासह अहमदनगर शहरात आले. बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ठाकरे यांचे ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.
अहमदनगरहून औरंगाबादला जाताना घोडेगावजवळ राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात राज ठाकरे यांच्यासोबत औरंगाबादला निघालेल्या दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीच्या बोनेटचे नुकसान झाले. अन्य एका गडीचेही नुकसान झाले. पुढे औरंगाबादजवळील वाळूज येथे ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना पुन्हा अपघात घडला. यात काही गाड्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या अपघातानंतर राज ठाकरे यांचा संपूर्ण ताफा औरंगाबादकडे मार्गस्थ झाला. राज ठाकरे सुखरुप औरंगाबादेत दाखल झाले आहेत. औरंगाबादमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
सभेची उत्सुकता शिगेला
मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढावेत, अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही सभा औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. याच मैदानावरून बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता याच ठिकाणी राज ठाकरे यांची उद्या सभा होणार असून, ही सभा ऐतिहासिक ठरेल, असे मनसेकडून सांगण्यात येत आहे.