अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडेला जामीन मंजूर

औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या बेकायदा गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी असलेल्या परळी येथील डॉ. सुदाम मुंडे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.

स्त्रीभ्रूण हत्या आणि अवैद्य गर्भपाताचा कर्दनकाळ डॉ. सुदाम मुंडे याच्या परळी (जि. बीड) येथील रुग्णालयात २०१६ मध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्याच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश झाला होता. डॉ. सुदाम मुंडे याच्या कुकर्माचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला होता. डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील देखील महिला येत असल्याचे तपासामध्ये उघड झाले होते. या प्रकरणानंतर अवैध गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. सुदाम मुंडेला सुरुवातीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने डॉ. सुदाम मुंडेला ५ वर्षांसाठी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतरही सुदाम मुंडेने लगेचच परळी येथे रामनगर भागात एक हॉस्पिटल सुरू केले होते. बीडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बोगस डॉक्टर शोध समितीने परळीतील रामनगर येथे ५ सप्टेंबर २०२० रोजी आरोपी सुदाम मुंडेच्या दवाखान्यावर छापा टाकला होता.

तेव्हा त्या ठिकाणी चार रुग्ण उपचार घेताना आढळले. तसेच वैद्यकीय उपकरणे व साहित्य आढळून आले. बीडचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी याबाबत फिर्याद दिली होती. या छाप्यावेळी डॉ. सुदाम मुंडे याने सर्व पथकाला धमकी दिली व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुदाम मुंडेला २३ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय दंड विधान कलम ३५३ प्रमाणे ४ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड कलम ३३ (२) मेडिकल व्यवसाय कायद्यान्वये ३ वर्षे शिक्षा आणि कलम १५ (२) इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यान्वये एक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात आरोपी सुदाम मुंडेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. सुदाम मुंडेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सदर प्रकरणात भा.दं.वि. कलम ३५३ लागू होणार नाही, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा बचाव ग्राह्य धरून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी डॉ. सुदाम मुंडेचा जामीन अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणात आरोपी सुदाम मुंडेतर्फे अ‍ॅड. शशिकांत एकनाथराव शेकडे यांनी काम पाहिले.

Share