मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज ठाकरे यांना आधीच ‘वाय’ प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून, त्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे.

मशिदीवरील भोंगेविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीची पत्रं आली होती. यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. काल (शुक्रवारी) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. अखेर आज राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बाळा नांदगावकरांनी घेतली होती गृहमंत्र्यांची भेट
राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बुधवारी भेट घेतली होती. राज ठाकरेंना धमकी देणारे पत्र माझ्याजवळ आल्याची माहिती नांदगावकर यांनी यावेळी गृहमंत्र्यांना दिली. “अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करू. तुम्हाला तर सोडणार नाहीच; पण राज ठाकरेंनाही मारून टाकू,” असे पत्रात लिहिले असल्याचे नांदगावकरांनी यावेळी म्हटले होते. हे पत्र कोणी लिहिले, कुठून आले याबाबत सध्या काहीही माहिती नाही, असे नांदगावकरांनी सांगितले होते. राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता.

Share