‘विक्रम’ चित्रपटातील ‘त्या’ गाण्यामुळे अभिनेते कमल हसन अडचणीत

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांचा बहुचर्चित ‘विक्रम’ हा चित्रपट येत्या ३ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील ‘पत्थला पत्थला’ या गाण्यामुळे कमल हसन अडचणीत सापडले आहेत. या गीतातून केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने केली असून, त्यावरून कमल हसन यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेते कमल हसन या नावाभोवती मोठे वलय आहे. बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कमल हसन यांचा मोठा बोलबाला आहे. केवळ कलाविश्वच नाही तर राजकीय वर्तुळातही कमल हसन यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळते. ते बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील तितकेच लोकप्रिय आहेत. कमल हसन यांनी ‘एक दुजे के लिये’, ‘सदमा’, ’चाची ४२०′ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी आपल्या प्रयोगशील अभिनयाने एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. लवकरच कमल हसन यांचा ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र, याच चित्रपटातील एका गाण्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

https://www.instagram.com/p/CdaEKa5PnZs/?utm_source=ig_web_copy_link

कमल हसन यांचा ‘विक्रम’ हा चित्रपट येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले. या चित्रपटातील ‘पत्थला पत्थला’ हे गाणे कमल हसन यांनी लिहिले असून, अनिरुद्ध रविचंदर यांनी ते संगीतबद्ध केले आहे. मात्र, याच गाण्यामुळे कमल हसन अडचणीत सापडले आहेत. या गाण्याचे बोल वादग्रस्त आहेत. या गाण्यात केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवली जात आहे. तसेच यामुळे लोकांमध्ये फूटही निर्माण होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सेल्वम यांनी केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमने गाण्यामध्ये बदल करून ते चित्रपटातून काढून टाकावे, अशी विनंती सेल्वम यांनी केली आहे. या प्रकरणी कमल हसन यांच्याविरोधात चेन्नई येथील पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘पत्थला पत्थला’ या वादग्रस्त गाण्यामुळे कमल हसन यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेल्वम यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीवर काही कारवाई न झाल्यास ‘विक्रम’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. सध्या ‘पत्थला पत्थला’ हे गाणे टॉप ट्रेंडिंगमध्ये पाहायला मिळत आहे. या गाण्याला ७७० हून अधिक लाइक्स आणि १४ लाख व्ह्यूजही मिळाले आहेत. या गाण्याला सेल्वम यांनी आक्षेप घेतल्यामुळे कमल हसन ‘विक्रम’ चित्रपटातील हे गाणे काढणार का? गाण्याच्या लिरिक्समध्ये बदल करण्यात येणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

Share