अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग यांची आई तसेच पुण्यातील जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा सुहास जोग यांच्यासह चार जणांविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या अकरा शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या करून बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

जोग एज्युकेशन ट्रस्टने ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा शिक्षण विभागाकडून लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग, तत्कालीन जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी किशोर पवार, वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेवडे, हेमंत सावळकर या चौघांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते मे २०२२ या कालावधीत घडला आहे. बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून संस्थेवर प्रशासक नियुक्ती टाळण्यासाठी; तसेच ‘आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रस्तावासोबत खोटी स्वमान्यता प्रमाणपत्रे जोडली आहेत. तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार यांना प्रत्येक मान्यता प्रमाणपत्रासाठी २५ हजार याप्रमाणे ११ शाळांसाठी दोन लाख ७५ हजार रुपये जानेवारी २०२० मध्येच दिल्याचे म्हटले आहे.

अशी घडली घटना
आरोपींनी संगनमताने जोग एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या ११ शाळांची एप्रिल २०१९ ते मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे तयार केली. त्यावर खोट्या स्वाक्षरी तसेच बनावट जावक क्रमांकाची नोंद करून ही कागदपत्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालक यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केली. याशिवाय आरटीईद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून देण्यात येणाऱ्या प्रवेशाच्या शुल्काच्या परताव्यासाठी मुख्याध्यापकांद्वारे प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील खेडेकर हे करीत आहेत.

Share