मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक

मुंबई : मुंबईत दुचाकीस्वार आणि दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही आता हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आज हे आदेश काढले आहेत. १५ दिवसांनी याबाबत कारवाई सुरू होणार असल्याचे पोलिसांनी या आदेशात म्हटले आहे.

मुंबईमध्ये मोटारसायकवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट वापरणे बंधनकारक असणार आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मोटारसायकवरून प्रवास करताना हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपये दंड आणि ३ महिने लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे.

या संदर्भात मुंबई पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे विना हेल्मेट मोटारसायकल चालवतात. तसेच मागे बसलेली व्यक्तीसुद्धा हेल्मेटचा वापर करत नाही. वास्तविक पाहता मोटार सायकलस्वार यांनी त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे हे मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. हेल्मेटशिवाय मोटार सायकल चालवल्यास कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच तीन महिन्यासांठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, मोटारसायकलस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट वापरावे, अन्यथा १५ दिवसानंतर अशा मोटारसायकलस्वारांच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीवरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Share