अकरावी प्रवेशासाठी ३० मेपासून अर्ज भरण्यास होणार सुरुवात

पुणे : दहावी परीक्षेचा निकाल जूनमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारावीचा निकाल १० जूनला तर दहावी परीक्षेचा निकाल २० जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावीमध्ये उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी धावपळ होऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाकडून ३० मेपासून ऑनलाईन नावनोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावी वर्गाचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात. या प्रवेश प्रक्रियेला ३० मेपासून सुरुवात होत आहे. https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी धावपळ होऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाकडून ऑनलाईन नावनोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मेपासून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून प्रवेश अर्जाचा भाग-१ भरणे, ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे, मार्गदर्शन केंद्र निवडणे, अर्जामध्ये दुरुस्ती करून घेणे या गोष्टी करता येणार आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग विद्यार्थ्यांना भरायचा आहे. दुसर्‍या भागामध्ये नियमित किंवा कोट्यांतर्गत पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करायची आहे. त्यामुळे अर्जाचा पहिला भाग भरल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करणे व पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळणार आहे.

अर्ज भरण्यासाठी डेमो
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा, प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी २३ ते २७
मेदरम्यान पोर्टलवर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याचा सराव करून घेण्यात येणार आहे. पोर्टलवर डेमो लॉगिन देण्यात येणार आहे. ३० मे रोजी प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यावर डेमो लॉगिनमधील माहिती नष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी सुरू झाल्यावर नव्याने लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे.

Share