महिलांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव : कृषीमंत्री दादा भुसे

नाशिक : महिला शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ व महिलांच्या सन्मानासाठी लक्ष्मी योजनेत सातबाऱ्यावर त्यांचे नाव लावावे असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दाजा भुसे यांनी केले आहे. धन्वंतरी सभागृह शिक्षण प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान येथे आयोजित महिला शेतकरी परिसंवाद व आत्मा प्रकल्पात जिल्ह्यात वैशिष्यपूर्ण काम करणारे शेतकरी व शेतकरी गट पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात कृषी मंत्री दादाजी भुसे बोलत होते.

यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अनिताताई भुसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषि आयुक्तालयाचे संचालक विकास पाटील, कृषि संचालक कैलास मोते, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे व महिला शेतकरी उपस्थित होत्या.

ते पुढे म्हणाले की, कृषि क्षेत्रात २० वर्षापूर्वी महिलांचे नगण्य असणारे प्रमाण वाढतांना दिसत आहे. कृषि महाविद्यालयामंध्ये देखील शिक्षण घेण्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. पंरतु केवळ 14 टक्के महिलांच्या नावावर शेती असल्याने बँकेचे कर्ज, विविध शासकीय योजनांच्या लाभापासून त्या वंचित राहतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरातील महिलेचे नाव सातबाऱ्यावर लावावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषि क्षेत्राच्या विविध बाबींसाठी निर्णय घेतांना महिलांचा समावेश खूप आवश्यक असल्याचे आजच्या महिला शेतकरी परिसंवाद कार्यक्रमातून सिद्ध झाले आहे. स्वत: निर्णय घेतल्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्या शेतीमध्ये अधिक जोमाने काम करतात. महिलांचा सहभाग वाढल्यास शेतीमधील निव्वळ नफ्यामध्ये वाढ होईल. पिकाच्या गुणवत्तेत वाढ होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होईल, असा आशावादही यावेळी व्यक्त केला.

हळद व कापूस वेचतांना महिला शेतमजूरांना हाताला जखमा होवू नये यासाठी हातात मोजे व शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेली पिशवी देण्याबाबतही प्रयत्न सुरु आहेत. तसेच कमी वेळेत अधिक व चांगले काम कसे करावे याबाबतचे प्रशिक्षण महिला शेतमजूरांना देण्याचे नियोजन आहे. शेती मध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पोकरा योजनेमध्ये चार हजार गावांमध्ये ‘कृषि मित्र’ऐवजी ‘कृषि ताई’ची नेमणूक केली असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

Share