ताजमहालातील ‘त्‍या’ २० खाेल्‍यांचे दरवाजे बंदच राहणार : अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळली

अलाहाबाद : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहालातील बंद असलेल्या २० खोल्यांचे दरवाजे खुले करावेत, अशी मागणी करणारी याचिका आज अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने फेटाळली. ताजमहालमधील बंद खोल्यांबाबत विचारणारे तुम्ही कोण? ताजमहाल कोणी बांधला, याचा आधी अभ्यास करा, असे खडे बोल अलाहाबाद हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना यावेळी सुनावले.

प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ताजमहालबाबत गेल्या काही दिवसांपासून नवनवीन दावे केले जात आहेत. ताजमहालातील बंद असलेल्या २० खोल्या खुल्या करून तेथे हिंदू मूर्ती वा शिलालेख आहेत किंवा कसे, त्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका भाजपचे प्रवक्ते व अयोध्या शाखेचे प्रसिद्धीप्रमुख डॉ. रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल केली होती. ताजमहाल हा तेजो महालय महादेव मंदिर असल्याचा दावा करीत ताजमहाल परिसराचे सर्वेक्षण आवश्यक आहे. यातूनच वास्तव काय ते समोर येईल. सत्य काय ते समोर यावे म्हणून सरकारला सत्यशोधन समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा विभागाला ताजमहालच्या आत असलेल्या २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथे हिंदू शिल्प आणि शिलालेख लपलेले आहेत की नाही हे कळू शकेल, अशी मागणी डॉ. रजनीश सिंह यांनी या याचिकेत केली होती. आज गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात न्‍यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्‍याय आणि न्‍यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्‍या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारत ही याचिका फेटाळून लावली आहे.

आधी ताजमहाल कोणी बांधला याचा अभ्यास करा, ताजमहालबाबत योग्य ते संशोधन करून मगच याचिका दाखल करा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले. तसेच याचिका दाखल करणार्‍यांनी एका विद्यापीठात प्रवेश घ्‍यावा. याचिकेत नमूद केलेल्‍या विषयावर स्‍वत: संशोधन करावे. तुम्‍हाला विद्यापीठाने प्रवेश नाकारल्‍यास तुम्‍ही आमच्‍याकडे या, असे न्‍यायालयाने यावेळी स्‍पष्‍ट केले.

आमच्या मते याचिकाकर्त्यांनी आम्हाला पूर्णपणे न्यायसंगत मुद्द्यावर निर्णय देण्यास प्रवृत्त केले आहे, असे म्हणत याचिकाकर्त्यांनी केलेल्या सत्यशोधन समितीच्या मागणीचाही न्यायालयाने समाचार घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून तुम्हाला नेमके काय जाणून घ्यायचेय? असा सवाल करीत सदर याचिका ही योग्य आणि न्यायिक मुद्द्यांवर आधारित नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. ताजमहालमधील २२ खोल्या उघडण्यासाठी व सत्य शोधण्यासाठी तुम्ही एका समितीची नेमणूक करण्याची मागणी करत आहात. अशी मागणी करणारे तुम्ही कोण? हा तुमचा अधिकार नाही. तु्म्हाला उत्तर हवे असेल तर तुम्ही माहिती आधिकारातून जाणून घेऊ शकता, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

यावेळी न्‍यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांनी याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावत जनहित याचिकांच्या व्यवस्थेचा दुरुपयोग न करता आधी ताजमहाल कोणी बांधला याचा अभ्यास करा, विद्यापीठात जाऊन पीएच. डी. करा आणि मग कोर्टात या, असा सल्ला दिला आहे. जनहित याचिका ही एक सुविधा आहे. त्‍याचा दुरुपयोग करू नका. उद्या तुम्ही येऊन न्यायाधीशांच्या कक्षेत जाण्याची परवानगी मागाल. असे कसे चालेल? असा सवाल न्यायालयाने केला. तुम्हाला ज्या विषयाबाबत काही माहिती नाही त्याचा अभ्यास करा. जर तुम्हाला कोणी अभ्यास किंवा संशोधन करण्यापासून रोखले तेव्हा कोर्टाकडे न्याय मागू शकता, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले.

Share