लढवय्या शिवसैनिकाचे जाणे धक्कादायक; आमदाराच्या निधनानंतर मुख्यमंत्री गहिवरले

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, आमदार रमेश लटके लढवय्या शिवसैनिक होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. त्याच जोरावर ते आता सलग दोनदा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चांगला संपर्क असणारा, विकास कामांचा ध्यास घेतलेला, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबीयांवर आघात आहे. लटके कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आमदार रमेश लटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असं उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार

रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लटके यांनी १९९७ ते २०१२ अशा सलग ३ वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर २०१४ मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Share